प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतामध्ये मोठय़ा कष्टाने पीक उभे करणारा सांगली, कोल्हापूरमधील पुरामुळे त्रस्त झालेल्या बळीराजाच्या मदतीला पालिकेतील काही वाहनचालकांनी धाव घेतली आहे. आपल्याला जमेल तेवढी आर्थिक मदत देऊन या चालकांनी सांगली जिल्ह्य़ातील दोन गावांमधील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पोहोचत्या केल्या. पालिकेतील राजकारणी, अधिकारी अथवा अन्य सेवा-सुविधांच्या वाहनांचे सारथ्य करणाऱ्या या चालकांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे कौतुकाचा वर्षांव होत आहे.

काही दिवसांपूर्वी कोसळलेला मुसळधार पाऊन आणि धरणांमधून सोडण्यात न आलेले पाणी यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ांतील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी पहिल्या मजल्यावर  पोहोचले होते. कोल्हापूर-सांगली परिसरात एकूणच हाहाकार उडाला होता. काही दिवसांनी पुराचे पाणी ओसरू लागले आणि पूरग्रस्त भागात मदतकार्याने वेग घेतला. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींनी पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू केला आहे.

पूरग्रस्त भागात उडालेली दाणादाण, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, जल विभागासह विविध खात्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर, सांगलीमध्ये केलेले मदतकार्य याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत होत्या. वृत्तवाहिन्यांवर पूरस्थितीचा आढावा घेतला जात होता. कोल्हापूर, सांगलीमध्ये एकूणच परिस्थिती गंभीर बनली होती. यासंदर्भात पालिकेच्या रुग्णवाहिनी यानगृहामधील कामगार, चालकांमध्ये चर्चा सुरू होती. पूरग्रस्त भागातील बळीराजा संकटात सापडला आहे. बळीराजाला मदत करण्याची इच्छा काही वाहनचालकांनी सहकाऱ्यांच्या वॉटस्अपवर व्यक्त केली. बळीराजाला मदत करण्याची कल्पना चालकांना भावली आणि त्यांनी तात्काळ एका बैठकीचे आयोजन केले. जमेल तेवढी आर्थिक मदत उभी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानगृहातून आर्थिक मदत गोळा होऊ लागली. कुणी ५०० रुपये, तर कुणी एक हजार रुपये वर्गणी स्वरूपात दिले. सुमारे ६९ चालकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि ६४ हजार ५०० रुपये गोळा झाले. गोळा झालेल्या रकमेतून गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहाची भुकटी, तुरडाळ, मूग, मटकी, सोलापुरी चादरी आणि टॉवेल आदी साहित्य खरेदी करण्यात आले.

एका कुटुंबाला पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो साखर, चहाची भुकटी, तुरडाळ, मूग, मटकी अशा जीवनावश्यक वस्तूंसोबत सोलापुरी चादर आणि टॉवेल देण्याचा निर्णय चालकांनी घेतला. एकूण १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देता याव्यात यादृष्टीने त्या वेष्टनात गुंडाळून ठेवल्या. या सर्व वस्तू सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुक्यातील भरतवाडी आणि कणेगावातील पूरग्रस्त कुटुंबापर्यंत कशी पोहोचवायची असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी चालक प्रकाश जेधे, एकनाथ शिर्के, विजय मामुणकर, रावसाहेब खुडे, दीपक घोडके आणि अब्बास मुलानी या सहा जणांनी पुढाकार घेतला आणि सांगली गाठली. सहकाऱ्यांनी पाठवलेली मदत या सहा जणांनी भरतवाडी आणि कणेगावातील पूरग्रस्त कुटुंबांना पोहोचती केली.

शेतामध्ये काबाडकष्टाने धनधान्य पिकविणारा बळीराजा पुरामुळे अडचणीत सापडला आहे. त्याला मदतीचा हात देण्याची सर्वाचीच इच्छा होती. प्रत्येकाने ऐपतीप्रमाणे मदत केली आणि १०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात यश आले.

– प्रकाश जेधे, चालक.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of essential commodities to 100 families in sangli kolhapur district abn
First published on: 03-09-2019 at 01:09 IST