मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून दादरची बाजारपेठ रंगबिरंगी फुले, रांगोळी, झगमगते कंदील व अन्य सजावटीच्या साहित्याने सजली आहे. दररोज सायंकाळी दादर रेल्वे स्थानकाबाहेर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक व आसपासच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. तसेच, फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गर्दीची समस्याही जटिल होत आहे. गर्दी नियोजनातील अभावामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर मार्केटमध्ये सणासुदीला विशेषतः दिवाळीच्या कालावधीत प्रचंड गर्दी होते. स्वस्त आणि दर्जेदार सामान मिळत असल्याने अनेकजण खरेदीसाठी या ठिकाणाला पसंती देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने फुलली आहे. जागोजागी रंगीबेरंगी फुलांच्या माळा, रांगोळीचे रंग, झगमगते कंदील, दिवे, पणत्या, तोरण, रांगोळीचे साचे आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ग्राहकांची सकाळपासून खरेदीसाठी रीघ लागलेली असते.

अनेकजण कार्यालयातून सुटी झाल्यानंतर थेट खरेदीसाठी बाजारपेठ गाठत असल्याने सायंकाळी याठिकाणी प्रचंड गर्दी निर्माण होते. रविवारी देखील दादर मार्केटमध्ये जीवघेणी गर्दी झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान, गर्दीमुळे दररोज तेथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्ता गाठण्यासाठी केवळ ३ ते ४ मिनिटे लागतात. मात्र, सद्यस्थितीत गर्दीतून वाट काढून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी नागरिकांना १० ते १५ मिनिटे लागत आहेत.

अरुंद रस्ते त्यात फेरीवाल्यांच्या पथाऱ्या आणि अनधिकृत पार्किंग आदींमुळे नागरिकांना चालायला रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. वाढती गर्दी आणि वाहतुकीचा गोंधळ यामुळे स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन जीवन असह्य झाले आहे. सणासुदीचा काळ संपेपर्यंत गर्दी ओसरण्याची शक्यता नसल्याने प्रशासनाने गर्दी नियोजनासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनीही सुलभ वाहतुकीसाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीतून मार्ग काढताना वृद्ध, अपंग तसेच, महिलांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याने ग्राहकांचीही संख्या वाढत आहे. महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी दादरमधील फेरीवाल्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी पालिकेच्या कडक कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी विविध मार्ग अवलंबून व्यवसाय सुरू केले. त्यानंतर महानगरपालिकेची कारवाईही थंडावली. परिणामी, दादरमधील बाजारपेठेत पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.