साहित्य ‘छंद’!
दरवर्षी नावीन्यपूर्ण साहित्यकृती घेऊन वाचकांपुढे येणारा ‘आपले छंद’चा यंदाचा अंकही अभिरुची जोपासणारा आणि वाढवणारा आहे. कथा, माहिती-संशोधनपर लेख, चित्रे, व्यंगचित्रे आणि बहुभाषिक निवडक काव्यसंग्रह ही यंदाच्या अंकाची वैशिष्टय़े आहेत. भारत सासणेंच्या ‘काव्य रामायणा’पासून ही साहित्य दिंडी सुरू होते. मग पुढे रवी परांजपे यांचा रंग आणि राष्ट्र विचार, श्रीधर माडगूळकर यांनी उलगडून दाखवलेला गीतरामायणाचा प्रवास, विठ्ठल वाघांची आगळय़ा भाषेतील मातीची गोष्ट, नागनाथ कोत्तापल्ले यांनी रंगवलेले नांदेड परिसरातील बालपण, रंगनाथ पठारेंची एका गावाची गोष्ट, डॉ. मुग्धा सांगलेकर यांनी रंगवलेल्या बालकवींच्या साहित्य आठवणी असे एकेक वाचनीय थांबे यात जोडले जातात. मिलिंद बोकील, रामदास फुटाणे, डॉ. यशवंत पाठक, माधव कर्वे, महाबळेश्वर सैल, महावीर जोंधळे अशा अन्य लेखकांचे साहित्यही आपले अनुभवविश्व समृद्ध करत जाते. विविध २४ भाषांमधील प्रतिभावंत कवींच्या २९ कवितांचा एकत्रित संग्रह ही तर या अंकाची मेजवानी ठरते. नीलेश जाधव यांची व्यंगचित्रे लक्ष वेधून घेतात. या जोडीलाच उत्तम छपाई, वेधक मांडणी या साऱ्यांमुळेच ‘आपले छंद’चा अंक संग्राह्य़ ठरला आहे.
आपले छंद, संपादक – दिनकर शिलेदार, पृष्ठे – २२८, किंमत – २०० रुपये

बाजारहाट ते ई-बाजार
खरेदी किंवा निव्वळ बाजारात फेरफटका मारण्याची आवड बहुतेकांना असते. त्याच धर्तीवर विविध बाजारपेठांचा इतिहास ते अगदी अलीकडे फोफावलेला ई-बाजार याचा वेध ‘प्रहार’ने दिवाळी अंकात घेतला आहे. त्यामुळे खरेदीची आवड असणाऱ्यांबरोबर विविध ठिकाणच्या प्रसिद्ध बाजारपेठांचा वेध अंकात आहे. यामध्ये उत्तर कोकणमधील प्राचीन बंदरे व बाजारपेठा, कणकवलीचा बाजार तसेच मुंबईतील चोरबाजार फिरताना तासन्तास कसे जातात हे कळतदेखील नाही याचे वर्णन ओल्ड इज गोल्ड या लेखात प्रदीप म्हापसेकर यांनी केले आहे. सारंगखेडा, अकलूज, कऱ्हाड, परळी, पंढरपूर येथील घोडेबाजारांची वैशिष्टय़े उल्लेखनीय आहेत. मुंबईच्या बाजारपेठांचा रंजक इतिहास त्यामध्ये अगदी पहिले मार्केट कधी बांधले गेले इथपासून ते आताची मॉल संस्कृती असे सारे काही आहे. बहुतेक ठिकाणी तालुक्याच्या किंवा मोठय़ा गावातील आठवडा बाजारांत झालेले बदल त्यातून बदलत्या समाजजीवनाचा वेध ‘आपुलाच वाद आपणासी’ या लेखात प्रा.जी.ए.सावंत यांनी घेतला आहे. दक्षिण कोकण ही जगातील मोठी बाजारपेठ होती असे दाखले इतिहासात दिले जातात. मात्र आता हा व्यापार अडगळीत का गेला? त्याचा धांडोळा किशोर राणे यांनी सोन्याचा धूर. कोकण नवनिधी आहे या लेखात घेतला आहे. सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांच्या बाजाराची रंजक कहाणीही आहे. प्रहार, किंमत ५० रुपये, पृष्ठे ९६,
निवासी संपादक-संतोष वायंगणकर

मनाचा मनमोकळा वेध  
ग्रामीण भागातील लेखकांना कायम लिहितं करणारा आणि ९१ वर्षे सातत्य राखणारा किरात प्रकाशनचा यंदाचा दिवाळी अंक मन या विषयावर बेतला आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी आणि लेखिका विनिता पिंपळखरे यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. रजनीश जोशी यांची दिगंबर कथा असो किंवा प्रेमाचा प्रकाश ही अनुराधा फाटक यांची कथा असो मनाच्या हिंदोळ्यांवरील या कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. शिल्पा पांगे, लिलाधर घाडी, सीताराम टांककर, पद्मा फातर्फेकर, स्मिता पोतनीस यांच्याही कथा वाचनीय आहेत. महादेव साने यांची मिश्किली आणि मधुकर घारपुरे यांचा विनोदोत्सव वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून जातो. मनाच्या अनेकविध कांगोऱ्यांना स्पर्श करणारे लेखही या अंकात वाचायला मिळतात.
किरात : संपादक : अ‍ॅड. शशांक मराठे; पाने : १८८; किंमत : ८० रुपये

वैद्यक क्षेत्राची सर्वागीण ओळख  
रुग्णांचे अधिकार, जबाबदाऱ्या, विविध औषधोपचारांच्या पद्धतीमधील वेगळेपणा आणि त्यातील पाळावयाची पथ्ये याबाबतची रंजक माहिती  श्री धन्वंतरी अंकात वाचायला मिळते. मृत्यूनंतरही वैद्यक क्षेत्राला मदत होणारे देहदान नेमके कसे करता येते आणि त्याबाबत आवश्यक असलेली जनजागृती याबाबत प्रसाद मोकाशी आणि प्रकाश बाडकर यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. कर्णबधीर मुलांसाठी असलेल्या शाळेच्या शिक्षिका गीता गावडे यांनी लिहिलेला कर्णबधीर मुलांसाठी मार्गदर्शन हा लेख केवळ त्या मुलांच्या पालकांसाठीच नाही तर सर्वसामान्य पालकांनीही वाचावा असा आहे. श्री धन्वंतरी : संपादक : शुभांगी गावडे;  पाने : ११८; किंमत : ७० रूपये