मुंबई : दिवाळीच्या खरेदीसोबत वाचकांना उत्सुकता असते ती दिवाळी अंकांची. यंदाही विविध विषयांवरील दिवाळी अंक बाजारात दाखल झाले आहेत. मराठी साहित्य वाचणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सुरू असतानाच, नव्या विषयांवर प्रकाशित होणारे दिवाळी अंक, नवोदित लेखकांचा सहभाग, ऑनलाईन विक्री, तसेच विषयांचे वैविध्य यामुळे दिवाळी अंकांच्या वाचकवर्गात वाढ होत आहे. अनेक अडचणींवर मात करून ३५० हून अधिक दिवाळी अंक यंदा प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे यंदांही वाचकांना दिवाळी अंकांची साहित्यिक मेजवानी अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रात दिवाळी अंकांची परंपरा शंभरहून अधिक वर्षे सुरू आहे. यानिमित्ताने वाचकांना कथा, प्रवास वर्णने, विशेष लेख, कविता यासह विविध लेखांचा आस्वाद घेता येतो. यामुळे सजावट, फराळ, फटाके याचबरोबर दिवाळी अंकांमुळे वाचकांची दिवाळी रंगतदार होत असते. यात दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसोबतच नव्या दिवाळी अंकांचा समावेश आहे. या अंकांमध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान ,आरोग्यविषयक, गुन्हेविषयक, पर्यटन आदी विषयांवर भर दिला आहे. याचबरोबर यातील निम्मे अंक ज्योतिष, वास्तू, या विषयांवरील आहेत. तसेच अमेरिकेतील मराठी भाषिक साहित्यिकांकडून ‘निनाद २०२५’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला आहे.
दिवाळी अंकाची संख्या वाढत आहे याबरोबरच नवोदीत लेखकांची संख्याही वाढते आहे. अंकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही आश्वासक गोष्ट आहे, असे मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे यांनी सांगितले. पूर्वी दिवाळी अंकात कथा या साहित्य प्रकारावर अधिक भर होता. आता मात्र कथेसोबतच प्रवास वर्णनांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता असे विविध विषय हाताळले जातात. यामुळे वाचकांना विविध विषयांचे वाचन करता येते, असेही त्यांनी सांगितले. दिवाळी अंक ही एक सांस्कृतिक परंपरा आहे. दिवाळी अंकांचे आर्थिक गणितही वेगळे आहे. मात्र आर्थिक अडचणींवर मात करून वाङ्मयाच्या प्रमापोटी अनेक संपादक आणि प्रकाशक दिवाळी अंक प्रकाशित करत असतात आणि यामुळे खऱ्या अर्थाने मराठीतील नव्या जुन्या लेखकांसाठी वाङ्मयीन व्यासपीठ उपलब्ध होत असते. असे ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचे संपादक कवी अरुण शेवते यांनी सांगितले.
ऑनलाईन खरेदीवर भर
अनेक वाचक दिवाळी अंक ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडत आहेत. विविध संस्था दिवाळी अंकाची ऑनलाईन विक्री करीत आहेत. अनेकदा ऑनलाईन खरेदीवर काही टक्के सूट देण्यात येते. तसेच काही प्रकाशक संस्थांकडून एकत्रित दिवाळी अंकांचे संच खरेदी केल्यांनतर त्यावरही सूट देण्यात येते. यामुळे वाचकांचा कल ऑनलाईन खरेदीवर अधिक असतो. यावर्षी वाचक मोठ्या प्रमाणावर दिवाळी अंकांची ऑनलाईन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष खरेदीलाही प्रतिसाद मिळत आहे, असे पुण्याच्या ‘बुकगंगा’कडून सांगण्यात आले.
मुखपृष्ठावरील चित्रांची परंपरा
दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याबरोबरच वाचकांना अंकांच्या मुखपृष्ठाविषयीही उत्सुकता असते. पूर्वीच्या तुलनेत सध्या विविध प्रकारच्या चित्रांची आणि छायाचित्रांची निवड मुखपृष्ठांसाठी केली जाते. यात अनेकदा नामवंत चित्रकारांच्या चित्रांचा समावेश असतो. तर अनेकदा दिवाळी अंकाच्या विषयानुसार मुखपृष्ठ सजवले जाते. यंदाही ‘मौज’, ‘हंस’, ‘शब्दालय’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ यासह अनेक दिवाळी अंकांनी वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ साकारले आहे.