चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला असतानाच आता मुंबई पोलिसांनी करोनाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. शहराच्या पोलीस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाबरोबरच मुंबईमध्येही करोनाबाधितांचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. असं असतानाच या संकटाच्या वेळीही करोनाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच आता चीन आणि भारतादरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्सकडून सायबर हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सायबर हल्ल्यांसाठी करोनाचा संदर्भ देत ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.

” कोवीड-१९ ची मोफत चाचणी करुन देण्याबाबत प्रसारीत होत असलेले ई-मेल खूप वाढत आहेत. त्यामध्ये दिलेली लिंक उघडू नका. आपल्याला फसवण्याचा हा एक मार्ग आहे. समजदार बना… सुरक्षित रहा,” असं ट्विट मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलं आहे. या ट्विटबरोबर एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये ‘फ्री कोवीड टेस्टींग’ अशा सबजेक्टने इमेल आल्याचा एक प्रातिनिधिक स्क्रीनशॉर्ट दाखवण्यात आला आहे.

हे इमेल कसे असू शकतात?

सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. चिनी हॅकर्स युझर्सला आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन दाखवणारा विषय [Email Subject] असलेला इमेल किवा मेसेज पाठवू शकतात. Free Covid Test, Free Covid-19Kit अशा विषयाचा मेल किंवा मेसेज पाठवून काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाऊ शकते. हा फसवणूक करणाराला इ मेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. covid2019@gov.in किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा, अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही इमेलला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not open phishing emails claiming to provide free covid 19 testing says mumbai police cp scsg
First published on: 25-06-2020 at 09:34 IST