मुंबईप्रमाणेच करोनाचा लढा देण्यासाठी मालेगावातही टास्क फोर्स नेमणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. मालेगावात काम करणाऱ्या टीमला पोर्टेबल साहित्य दिलं जाणार आहे. मालेगावात जे मृत्यू झाले आहेत ते करोनाविषयीच्या अज्ञानातून झाले आहेत. आता धर्मगुरुंच्या माध्यमातून त्यांना आम्ही करोनाची जाणीव करुन देतो आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

नाशिकमधल्या निष्णात डॉक्टरांची टीम तयार करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. तसंच खासगी रुग्णालयं सुरु करण्याचंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. राजेश टोपे हे मालेगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

नाशिकमधली खासगी रुग्णालयं सुरु झाली नाही तर कारवाई केली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या बेस्ट डॉक्टरांची टीम तयार करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणं शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाव अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना दिली आहे”. बैठकीत मालेगावमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली.

“२०० खाटांचं रुग्णालय करोनासाठी वापरलं जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना २४ तास दिले आहेत. जर ते जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचंच नाही हा दृष्टीकोन योग्य नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.