इंधनाच्या दरातील घसरण आणि ऐश्वर्य संपन्न सुविधांमुळे देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येचा आलेख वाढताना दिसत आहे. नुकत्याच नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात देशांतर्गत हवाई सफर करणाऱ्यांची संख्या ८ कोटी १० लाख ९१ हजारांवर नोंदवण्यात आली आहे. विमान कंपन्यांच्या वाढत्या स्पध्रेच्या धर्तीवर विमान भाडय़ात देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
सध्या देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्याने दहा विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. यात एअर इंडिया, गो-एअर, जेट एअरवेज, एअर कोस्टा, एअर पेगासस, एशिया, इंडिगो, स्पाईसजेट, तृजेत आणि विस्तार आदी विमान कंपन्यांचा समावेश आहे. यातील कंपन्यांच्या विमानातून २०१४ साली ६ कोटी ७३ लाख ८३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. २०१५ साली हाच आकडा ८ कोटी १० लाख ९१ हजारच्या घरात पोहोचला आहे. यात सर्वाधिक प्रवासी स्पाईस जेट, एअर कोस्टा, एअर इंडिया आणि इंडिगो कंपन्यांच्या विमानांनी प्रवास करत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
आíथक बाजारात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी विमान सेवा पुरविणारया कंपन्यांमध्ये प्रचंड स्पध्रेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दुष्टीकोनातून विमान कंपन्या प्रवासी भाडय़ात मोठय़ा प्रमाणात सवलती देत आहेत. अनेकदा वातानुकूलित रेल्वे गाडीच्या भाडय़ाच्या जवळ जाण्याइतपत प्रवासी भाडय़ात सवलती दिल्या जात असल्याने प्रवासीही विमान सेवेला पसंती देत आहेत. भारतातील विमान कंपन्यांची वाढती बाजारपेठ प्रमुख देशांची बरोबरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान प्रवाशांकडून सेवेत त्रुटी आढल्याने मोठय़ा प्रमाणात तक्रारीही नोंदवल्या जात आहेत. यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत सुमारे ३१०४ प्रवाशांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यात अवघ्या डिसेंबरमध्ये १०९१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींमध्ये विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांसोबत गरवर्तन, विमान उड्डाण रखडणे, तिकीट परत करताना होणारी गरसोय अशा विविध तक्रारी नोंदवल्या असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Domestic air passenger increase by 20 percent
First published on: 13-02-2016 at 01:22 IST