मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर होण्यात लागलेला वेळ ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या पथ्यावर पडला. या काळात कीर्तीकर यांचा जवळपास तीन विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के प्रचार पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. वायकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली असून भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

वायकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात आले. ठाकरे गटात असताना वायकर यांनीच अमोल कीर्तीकर यांची लोकसभेसाठी शिफारस केली होती. आता ते स्वत:च विरोधात आहेत. ठाकरे गटाने कीर्तीकर यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्यामुळे त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली. ठाकरे गटाचे आमदार असलेल्या दिंडोशी व अंधेरी पूर्व यासह गोरेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांचा ५० टक्क्याहून अधिक प्रचार पूर्ण झाल्याचा दावा कीर्तीकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> कोळीवाडे आणि गावठाणातील रहिवाशांनीही दिला आपला जाहीरनामा, कोळीवाड्यामध्ये झोपू योजना नको

गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे संजय निरुपम हे शिंदे गटात आल्याने आता काँग्रेसची मते आपल्याला मिळतील व आपला विजय पक्का आहे, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे. वायकर यांनी जुहू चौपाटीवर रविवारी सकाळी मतदारांशी संपर्क साधला. भाजप आमदार अमित साटम हे बरोबर होते. कीर्तीकर यांच्या प्रचार फेरीत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, ऋतुजा लटके यांच्यासह काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुरेश शेट्टी हे सहभागी झाले होते. निरुपम यांच्या सोडचिठ्ठीने काँग्रेसला फारसा फरक पडणार नाही, असा दावा सुरेश शेट्टी यांनी केला. महाविकास आघाडीचे कीर्तीकर हेच सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले. वायकर यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपच्या तिन्ही आमदारांवर सोपविण्यात आली आहे. उमेदवाराऐवजी मोदींना जिंकून आणायचे आहे हे लक्षात ठेवा, असे भावनिक आवाहन भाजप कार्यकर्त्यांच्या अंतर्गत बैठकीत केले जात आहे, असे सांगण्यात आले. आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत व महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असे आमदार साटम यांनी सांगितले.