लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वीज बिल भरण्यावरून झालेल्या वादातून भाडेकरूने घरमालकाचा हातोड्याने खून केला. गोवंडी येथे ही घटना घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या घरमालकाचा राहत्या घरात मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ६३ वर्षीय आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.

गणपती झा (४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते बैंगनवाडी परिसरात रहायचे. गुरूवारी बैंगनवाडी येथे त्यांच्या राहत्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जा ऊन पाहणी केली असता झा याचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत व्यक्तीचा चुलत भाऊ दिनेश झा याने परिसरात चौकशी केली असता वीज बिलाच्या वादातून त्याचे भाडेकरू अब्दुल शेख (६३) याच्यासोबत भांडण झाले होते. त्या वादातून शेखने लांगडी दांडक्याने व हातोड्याने गणपतीला मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानुसार दिनेश झा याने याबाबत शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अब्दुल शेखला अटक केली.

आणखी वाचा-मुंबई : पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार

३० एप्रिलला वीज बिलावरून गणपती व अब्दुल शेख यांच्यात वाद झाला होता. त्यातून गणपतीने शेखला शिवीगाळ केली. त्या रागाातून शेखने जिन्यावर चढून गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने कमरेला लावलेली हाताडी काढली व गणपतीच्या तोंडावर मारली. त्यावर गणपती गंभीर जखमी झाला होता. तो आपल्या घरी गेला. त्यानंतर दोन दिवसांनंतर राहत्या घरात तो मृतावस्थेत सापडला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.