म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीच्या जाहिरात प्रसिद्धी प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून कोकण मंडळानेही पुणे मंडळाप्रमाणे अनामत रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २० टक्के योजना, पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहप्रकल्पातील घरांसाठीची अनामत रक्कम दुप्पट केली आहे. तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या १० टक्के अनामत रक्कम म्हणून घेण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कोकण मंडळातील घरांसाठी ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरारमधील घरांसाठी अर्ज करणे इच्छुकांना आर्थिकदृष्टय़ा अडचणीचे ठरणार आहे.
कोकण मंडळाच्या घरांसाठी अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटानुसार अनुक्रमे ५, १०, १५ आणि २० हजार रुपये अशी अनामत रक्कम आहे. आता मात्र या रकमेत दुपटीने वाढ होणार आहे. कोकण मंडळाने २० टक्के योजना, पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा योजनेतील घरांसाठी अनामत रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे आता अत्यल्प गटासाठी १० हजार रुपये, अल्प गटासाठी २० हजार रुपये, मध्यम गटासाठी ३० हजार रुपये, तर उच्च गटासाठी ४० हजार रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या सोडतीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील दोन हजारांहून अधिक घरांचा समावेश आहे. या सोडतीसाठी घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून आकारली जाण्याची शक्यता आहे.
अनामत रक्कमवाढीचा प्रस्ताव मंडळाने तयार केला आहे. आतापर्यंत हा प्रस्ताव उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी जाणे अपेक्षित होते. मात्र प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील घरांसाठी एकूण किमतीच्या १० टक्के अनामत रक्कम आकारण्यावर एकमत होत नसल्याने प्रस्ताव रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान उच्चपदस्थ अधिकारी १० टक्क्यांवर ठाम आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत अनामत रकमेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव शक्य तितक्या लवकर मंजूर करून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या प्रयत्नात मंडळ आहे. त्यानुसार लवकरच इच्छुकांची सोडतीची प्रतीक्षा संपणार आहे. मात्र त्यांना अनामत रकमेसाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे.
पुणे मंडळापाठोपाठ कोकण मंडळाचेही घूमजाव
अत्यल्प आणि अल्प गटाच्या अनामत रकमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे म्हाडा प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र पुणे मंडळाने सर्व गटांतील घरांची अनामत रक्कम थेट पाचपट करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घूमजाव केले आहे. आता कोकण मंडळानेही सर्व गटांची अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अर्ज भरणे महाग होणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण रकमेच्या १० टक्के अनामत रक्कम.