scorecardresearch

न्युक्लिअर मेडिसीनचे जनक डॉ.रामचंद्र लेले यांचे निधन

जे.जे. रुग्णालयात अधिष्ठातापदी कार्य़रत असताना ते जसलोक संशोधन केंद्रामध्ये न्युक्लिअर मेडिसीन विभागाचे प्रमुख होते.

Dr Ramchandra Lele
(संग्रहीत छायाचित्र)

अणुशास्त्राचा वैद्यकशास्त्रात, उपचारपद्धतीतील (न्यूक्लिअर मेडिसिन) वापराचे जनक पद्मभूषण डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिल्यानंतर पुढील शिक्षणासाठी डॉ. लेले ब्रिटनला गेले. ब्रिटनमधून १९५७ साली ते परत आले आणि नागपूर वैद्कीय महाविद्यालयात रुजू झाले. या काळात त्यांनी वैद्यकीय संग्रहालय, मधुमेह दवाखाना सुरू केला. याच काळात डॉ. लेले यांनी कॅनडामधून न्युक्लिअर मेडिसिन या विषयात विशेष प्रशिक्षण घेतले. जे.जे. रुग्णालयात अधिष्ठातापदी कार्य़रत असताना ते जसलोक संशोधन केंद्रामध्ये न्युक्लिअर मेडिसीन विभागाचे प्रमुख होते.

भाभा अणुसंधान केंद्र आणि जसलोक रुग्णालय यांच्या सहकार्याने १९७० मध्ये त्यांनी जसलोकमध्ये न्युक्लिअर मेडिसीन हा स्वतंत्र विभाग सुरू केला. असंसर्गजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला यांचे महत्त्व जाणवून दिले. यामुळेच पुढे असंसर्गजन्य आजार नियंत्रणाचा स्वतंत्र कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.

वैद्यकीय क्षेत्रात १०० हून अधिक शोधनिबंध आणि ११ पुस्तके त्यांनी लिहिली –

डॉ. लेले यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले त्यावेळी म्हणजेच २०१७ साली त्यांचे ‘परस्युएट ऑफ एक्सलन्स’ हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले. डॉ. लेले यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय होतेच या शिवाय प्राध्यापक म्हणून त्यांचे या क्षेत्रात विशेष योगदान होते. वैद्यकीय क्षेत्रात १०० हून अधिक शोधनिबंध आणि ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन १९९२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भारतीय आण्विक समाजाच्यावतीने दिला जाणारा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार, प्रा. एम.विश्वनाथ राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले होते.

न्युक्लिअर मेडिसीन म्हणजे अणुशक्तीचा वापर करून केलेले उपचार किंवा निदान. सध्या रेडिओथेरपी, सिटी स्कॅन, एमआरआय इत्यादी वैद्यकीय उपचार आणि निदान पद्धतीमध्ये अणुशक्तीचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr ramchandra lele the father of nuclear medicine passed away mumbai print news msr