मुंबईमधील लहान-मोठय़ा नाल्यांतील गाळ युद्धपातळीवर उपसण्यात येत आहे. मात्र अनेक नाल्यांच्या काठी साचलेला गाळ आता रात्रीच्या वेळीही मुंबईबाहेर वाहून नेण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच नाल्यांतील गाळ मुंबईबाहेर नेण्यास सुरुवात झाली.
सध्या मुंबईमधील लहान-मोठय़ा नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपला असून नाल्यातून उपसलेला गाळ अनेक ठिकाणी नाल्याकाठी पडून आहे. सध्या दोन पाळ्यांमध्ये हा गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्यात येत आहे. एका पाळीत लहान नाल्यातील ४० डम्पर्समधून, तर मोठय़ा नाल्यांतील ६० मोठय़ा ट्रकमधून गाळ वाहून नेण्यात येत होता. परंतु नाल्यांतून मोठय़ा प्रमाणात उपसलेला गाळ काही ठिकाणी तसाच पडून आहे. त्यामुळे रात्रपाळीतही गाळ मुंबईबाहेर वाहून नेण्यात यावा, असे आदेश अजोय मेहता यांनी गुरुवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासूनच गाळ मुंबईबाहेर नेण्यास सुरुवात झाली. आता रात्रपाळीतही ४० डम्पर्स आणि ६० मोठय़ा ट्रकमधून गाळ वाहून नेण्यात येणार आहे. त्यामुळे गाळाची झटपट विल्हेवाट लावणे पालिकेला शक्य होणार आहे.