मुंबई : ओटीटी सारख्या नवमाध्यमाचा प्रभाव आणि घरबसल्या उपलब्ध असलेले मनोरंजन बाजूला सारत प्रेक्षक नाटकाला गर्दी करत असल्याने नाटय़ निर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहाचे प्रतिबिंब दसऱ्याच्या दिवशी पाहायला मिळाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर सात नवीन मराठी नाटकांची घोषणा करण्यात आली आहे.

यंदा अष्टविनायकची निर्मिती असलेल्या चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’, जयंत उपाध्ये लिखित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘मी बाई अ‍ॅडमिन’ अशी तीन नवीन नाटके रंगमंचावर येणार आहेत. याशिवाय, प्रशांत विचारे दिग्दर्शित ‘राजू बन गया जंटलमन’, रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित ‘२१७ पद्मिनी धाम’, विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मड सखाराम’ या प्रायोगिक नाटकांची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा >>> स्वाईन फ्लूच्या २९ रुग्णांचा मृत्यू ; राज्यात ऑक्टोबपर्यंत तीन हजार रुग्ण

‘नाटकाला सध्या चांगले दिवस आले आहेत. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. दसऱ्याचा दिवस शुभ असल्याने आम्ही नव्या नाटकाची घोषणा केली आहे’, अशी माहिती ‘२१७ पद्मिनी धाम’ नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक यांनी दिली. ‘व्यावसायिक रंगमंचावर जे विषय करता येत नाहीत ते प्रायोगिक मंचावर करता येतात आणि प्रेक्षकांचा प्रायोगिक नाटकांनाही प्रतिसाद मिळतो’, असे ‘मड सखाराम’चे दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘करोनाच्या आधी सुरू केलेले नवीन नाटकांचे प्रयोग ठप्प झाले होते. त्यामुळे नाटय़ व्यवसायाने पुन्हा उभारी घेतल्यानंतर आम्ही आधीच्याच नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता प्रेक्षक नाटकाकडे परतले आहेत याची जाणीव झाली’, असे निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले. त्यांच्या अष्टविनायक संस्थेने तीन नाटकांची घोषणा केली आहे. ‘गालिब’ हे नाटक ३ नोव्हेंबरला रंगमंचावर येणार आहे. तर ‘मर्डरवाले कुलकर्णी’ हे विनोदी नाटक २४ नोव्हेंबरला रंगमंचावर येईल असे दिलीप जाधव यांनी सांगितले. नाटकांना प्रेक्षक आलेच नसते तर नव्या नाटकांची घोषणाच झाली नसती, असे जाधव म्हणाले.