लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: हुलकावणी देत असलेला पाऊस, गेले काही दिवस वाढलेली उष्णता आणि निर्माण झालेली पाणीटंचाई याचा फटका भाजीपाल्याला बसला असून बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक आटली आहे. त्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या महागल्या आहेत. परिणामी, महागाईची झळ सर्वसामान्य ग्राहकांना सोसावी लागत आहे.

सध्या राज्यात पावसाच्या आगमनाला विलंब झाल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे भाज्यांचे उत्पादनही घटले आहे. बाजारात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. फ्लॉवर, कोबी, भेंडी, वांगी आदी भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर वधारले आहेत. तसेच इतर भाज्यांच्या तुलनेत टॉमेटोच्या भावात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३० रूपये किलो दराने विकला जाणारा टॉमेटो प्रतिकिलो ४० ते ४५ रूपये दराने मिळत आहे. दरम्यान, पाण्याअभावी पालेभाज्या वाळून जात असल्याने मोठे नुकसान होत आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात कोथिंबीर, मेथी आणि पालकच्या जुडीची ३० ते ४० रुपये दराने विक्री होत आहे. याचबरोबर उकाड्यामुळे लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र लिंबांचे दरातही वाढले आहेत.

आणखी वाचा-सहा महिन्यात केवळ ३८ काँक्रीट रस्ते, कंत्राटदारांना कार्यादेश देऊनही कामे संथगती

पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नाला फटका बसतो. यामुळे एप्रिल ते मे महिन्यात भाज्यांचे दर चढेच राहतात. मात्र, यंदा पावसाला विलंब झाल्यामुळे आवक घटली आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत भाज्यांचे दर असेच राहतील, असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या सहा ते आठ दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. कमी आवक झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत. उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या अभावामुळे आणखी काही दिवस भाजीपाल्याचे दर असेच राहतील. पालेभाज्यांवर पाणी मारावे लागते, परंतु पुरेसे पाणी नसल्यामुळे या भाज्यांची लवकर नासाडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात घेऊन ठेवता येत नाहीत. पावसाला सुरुवात होताच भाजीपाल्याचे दर कमी होतील. -अनंत पाटील, भाजी विक्रेते