मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल अवघ्या १३ दिवसात जाहीर केला आहे. मात्र अनेक परिपत्रके आणि ऑनलाईन बैठकांद्वारे सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक श्रेयांक खात्याचा (एबीसी आयडी) तपशील काही संलग्न महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे तब्बल १६ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

तर ‘बी.कॉम.’ सहाव्या सत्र परीक्षेत ५५.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आणि ४४.५३ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.मुंबई विद्यापीठाच्या ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्र परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १५ हजार ४४५ म्हणजेच ५५.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ‘एबीसी आयडी’अभावी १६ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले.

या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर सदर निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने सूक्ष्म नियोजन केले होते. परीक्षा संपल्यापासून जलदगतीने मूल्यांकन प्रक्रिया पार पाडल्याबद्दल सर्व शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचे निकाल राखीव का? ‘एबीसी आयडी’चे महत्व. . .

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी) या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती व संबंधित कागदपत्रे नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरी संकेतस्थळ आणि ‘डीजी लॉकर’ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे या दस्तऐवजांचे यशस्वी अपलोड आणि पुनर्प्राप्तीसाठी शैक्षणिक श्रेयांक खाते असणे अनिवार्य आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक श्रेयांक प्रणालीमध्ये ( ‘एबीसी आयडी’) हस्तांतरित करणे अनिवार्य आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ नुसार ज्या विद्यार्थ्यांचे ‘एबीसी आयडी’ उपलब्ध असतील, फक्त अशाच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. जर विद्यार्थ्यांकडे ‘एबीसी आयडी’ नसेल, तर निकालामध्ये ‘एबीसी आयडी उपलब्ध नसल्यामुळे राखीव’ असे नमूद करण्यात येणार आहे. मात्र अनेक परिपत्रके आणि ऑनलाईन बैठकांद्वारे सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या ‘एबीसी आयडी’चा तपशील काही संलग्नित महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे सादर न केल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्र परीक्षेच्या १६ हजार ५२१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत.