मुंबई: मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व कामाचा भाग असलेली नालेसफाईची कामे हाती घेतली असून उपसलेला गाळ नाल्यालगतच ठेवण्यात आला आहे. मात्र मुंबई दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या तडाख्यात नाल्याकाठी ठेवलेला गाळ आसपासच्या परिसरात पसरल्यामुळे नाल्यालगतच्या परिसरात चिखल झाला असून हा चिखल तुडवत नागरिकांना चालावे लागत आहे. यामुळे गोवंडी-मानखुर्द परिसरात अस्वच्छता पसरली असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेतर्फे नालेसफाई करण्यात येते. संपूर्ण वर्षभरात ८० टक्के नालेसफाई पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के पावसाळ्यादरम्यान करण्यात येते. तसेच पावसाळ्यानंतर १० टक्के गाळ काढला जातो. नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात नाल्याकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागते.
पालिकेने गोवंडी-शिवाजीनगर, मानखुर्द या भागांमधील नालेसफाईची कामे हाती घेतली असली तरीही गाळ उचलण्यात दिरंगाई होत असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ ४८ तास नाल्याकाठी ठेवणे गरजेचे असते. त्यानंतर तातडीने त्याची विल्हेवाट लावणे अपरिहार्य असते. मात्र, गोवंडी, मानखुर्दमधील काही भागात नाल्यातून काढलेला गाळ आठवडाभर, तर अनेक ठिकाणी महिनाभर कायम आहे.
विहित वेळेत गाळाची विल्हेवाट न लावल्याने मोसमी पावसाच्या पहिल्या दिवशी रस्त्यावर गाळामुळे चिखल झाला होता. त्यांनतर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे सुकलेला गाळ पुन्हा ओला झाला. शीव-पनवेल महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत वर्षानुवर्ष अस्वच्छता आहे. अपुऱ्या कचराकुंड्या, क्षमतेपेक्षा निर्माण होणारा कचरा यामुळे रस्त्यावर कायमच दुर्गंधी व अस्वच्छता असते. मात्र, आता नाल्यातून उपसलेल्या गाळामुळे अस्वच्छतेत आणखी भर पडली आहे.
गोवंडीतील बैंगनवाडी, म्हाडा वसाहत, कमला रमण नगर, राजा चौक आदी विविध परिसरांत नालेसफाईची स्थिती सारखीच आहे.महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत नालेसफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. अनेकदा याबाबत महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, पालिकेकडून कार्यवाही केली जात नाही. कंत्राटदारांवर दंड ठोठवल्याची तोंडी माहिती अधिकारी देतात. मात्र, त्याबाबत पुरावे मागितल्यास मौन धारण करतात, असा आरोप गोवंडी वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी केला आहे.
गाळ उचलण्यास सुरुवात
आतापर्यंत कंत्राटदारांना ३० ते ४० वेळा दंड ठोठावला आहे. तसेच, अनेक वेळा नोटिसाही बजावल्या आहेत. मोसमी पाऊस सुरू झाल्यामुळे गाळ उचलण्याची कामे वेगाने होत आहेत. कंत्राटदाराकडून गाळ उचलण्यात दिरंगाई झाल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका हा गाळ उचलत आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ओल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या योजना नाहीत. तो कोरडा होण्यासाठी नाल्यांशेजारीच ठेवावा लागतो. मात्र, मुसळधार पावसात तो तसाच ठेवला, तर पुन्हा गाळ नाल्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तो पूर्णपणे सुकण्याची वाट बघता येणार नाही. पावसाची सतत रिपरिप सुरू राहिली, तर ४८ तासांचा कालावधी कमी करून तो २४ तासांत उचलावा लागेल. तसेच, पावसाने विश्रांती घेतल्यास तो ४८ तास ठेवणे शक्य होईल. – अभिजित बांगर, पालिका अतिरिक्त आयुक्त