मुंबई: अंधेरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ मार्गिकेच्या कामादरम्यान शुक्रवारी रात्री सहार येथील पी ॲण्ड टी वसाहतीलगत आठ मीटर खोल आणि अडीच मीटर व्यासाचा खड्डा पडला. पी ॲण्ड टी वसाहतीतील सात मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर हा खड्डा पडल्याने या इमारतीतील रहिवाशांना तात्काळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पंचतारांकित हॉटेलमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. तर, तात्काळ भुयारीकरणाचे काम थांबविण्यात आले असून खड्डा भरला आहे.

‘एमएमआरडीए’कडून ३.४४२ किमी लांबीच्या मेट्रो ७ अ मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. या मार्गिकेतील २.४९ किमीचा भाग भुयारी आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी या २.४९ किमीच्या भुयारी मार्गाच्या कामाला टनल बोरींग मशीनच्या (टीबीएम) सहाय्याने कामास सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास भुयारीकरणाचे काम सुरू असताना सहार येथील पी ॲण्ड टी वसाहतीतील एका सात मजली इमारतीलगत भलामोठा खड्डा पडला. हा खड्डा आठ मीटर खोल आणि अडीच मीटर व्यासाचा होता. इमारतीला धोका निर्माण झाल्याने ‘एमएमआरडीए’ने या इमारतीतील नऊ कुटुंबाना तात्काळ पंचतारांकित हॉटेलमध्ये स्थलांतरित केले आहे.

हेही वाचा >>>TISS Student Dead : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा विद्यार्थी पार्टीनंतर मृतावस्थेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारतींना धोका पोहोचण्याची भीती

भुयारीकरणादरम्यान जिथे खड्डा पडला त्या ठिकाणी मोठी पोकळी होती. ही पोकळी असल्याचे कामादरम्यान लक्षात न आल्याने हा खड्डा पडल्याचेही ‘एमएमआरडीए’कडून सांगितले जात आहे. भुयारीकरणादरम्यान, सहार परिसरातील अनेक भागांमधील इमारतींना धोका पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. कामादरम्यान सातत्याने इमारतींना हादरे बसतात, अशी माहिती वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा यांनी दिली आहे.