मुंबई: कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेण्याचा निर्धार शिवसेनेने (ठाकरे) केला आहे. शिवसेनेने दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना देण्याचा सल्ला भाजपने शिवसेनेला दिला. पण त्याच वेळी नागपूरमध्ये होणाऱ्या रा. स्व. संघाच्या मेळाव्यावर मौन बाळगल्याबद्दल शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेना दसरा मेळाव्याची मागील ५८ वर्षांची परंपरा आहे. २००६ साली दसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे हा मेळावा त्या एकाच वर्षी रद्द करण्यात आला होता आणि २००९ साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत राज्यासह देशावर करोनाचे संकट आल्याने दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी घेण्यात आला होता. २०२२ साली शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा आयोजित होऊ लागला.

शिवसेना ठाकरे गटाचा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क येथेच दसरा मेळावा होत आहे. सुरुवातील शिंदे गटाकडूनही मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचा आग्रह धरण्यात आला होता, मात्र त्यानंतर सामोपचाराची भूमिका घेत शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला. यंदा आठवडाभर पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र ठाकरे गट दसरा मेळाव्याच्या तयारीलाही लागला आहे. यासाठी आवश्यक असलेल्या भव्य व्यासपीठाची रचना आणि महत्त्वाच्या व्यक्तींची आसनव्यवस्था, त्याचप्रमाणे शिवसैनिकांसाठी शिवाजीपार्क मैदानात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी तयारी रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. कितीही पाऊस झाला तरी शिवाजीपार्कवरच दसरा मेळावा घ्यायचा हे रविवारी यासंदर्भात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही निश्चित करण्यात आले.

भाजपचा सल्ला

शिवसेना ठाकरे गटाते दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा सल्ला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यांचा तब्बल तीन तासांचा दौरा करून दुख; वेदना, व्यथा व्यक्त केली. मुख्यमंत्री असताना कधी कृती न करता घरात बसून राहिलात आता त्याचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, असा उपरोधिक टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

ठाकरे यांना सल्ला देणाऱ्या उपाध्ये यांनी तसा सल्ला मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलेला नाही. भागवत यांना उपाध्ये यांनी असाच सल्ला का दिला नाही, असा सवाल शिवसेनेने केला आहे. मेळावाच रद्द करायचा असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रद्द करावा, त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी दिले.