मुंबई : गेटवे आॅफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)असा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण करण्याचे प्रवाशांचे, जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय जेएनपीएने घेतला आहे. त्यानुसार दोन ई वाॅटर टॅक्सी तयार झाल्या असून २२ सप्टेंबरपासून या ई वाॅटर टॅक्सी गेटवे ते जेएनपीएदरम्यान धावणार आहेत, सेवेत दाखल होणार आहे.

गेटवे ते जेएनपीएदरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी एक तास किंवा कधी त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो. त्यात सर्व लाकडी बोटी आता जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जेएनपीएने या मार्गावर विद्युत वाॅटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अतिजलद आणि सुरक्षित प्रवास हा उद्देश या मागे होताच, पण त्याचवेळी प्रदूषण कमी करणारी सेवा या जलमार्गावर सुरु करण्याचेही उद्दिष्ट जेएनपीएचे होते. त्यामुळे या मार्गावर ई वाॅटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आधी या टॅक्सी परदेशात तयार करण्यात येणार होत्या. पण नंतर त्या भारतातच तयार करण्याचा निर्णय घेत माझगाव डाॅक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम देण्यात आले. या वाॅटर टॅक्सी तयार होऊन यापूर्वीच सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणाने ई वाॅटर टॅक्सी तयार होण्यास विलंब झाला. आता मात्र दोन ई वाॅटर टॅक्सी सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. २२ सप्टेंबरपासून ई वाॅटर टॅक्सी सुरु होणार असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली.

भारतात बांधणी झालेल्या या दोन वाॅटर टॅक्सीपैकी एक वाॅटर ट्रक्सी सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णत विद्युत वाॅटर टॅक्सी आहे. या बोटींची प्रवासी क्षमता २० प्रवासी अशी असून गेटवे ते जेएनपीए प्रवासासाठी १०० रुपये असे तिकिट दर असण्याची शक्यता आहे. या ई वाॅटर टॅक्सीच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुप यांच्याकडे देण्यात आली आहे.

भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल काझानी यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार सध्या जेट्टीवर ई वाॅटर टॅक्सीसाठी चार्चिंग स्टेशन तयार करण्याचे काम सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन २२ सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात दोन ई वाॅटर टॅक्सी गेटवे ते जेएनपीएदरम्यान धावतील. या प्रवासासाठी लाकडी बोटीने किमान एक तास लागतो. पण वाॅटर टॅक्सी सुरु झाल्यास ही वेळ ४० मिनिटांवर येईल असेही काझानी यांनी सांगितले. तर दुसऱ्या टप्प्यात चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. आता ई वाॅटर टॅक्सीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याने प्रवासी आणि जेएनपीएच्या कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असेल.