मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या मुंबईतील सदनिकेवर टाच आणली आहे. याशिवाय या प्रकरणात इतर आरोपींच्या मालमत्तांसह एकूण १४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. यापूर्वी चव्हाण यांच्या घरात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत सापडलेली मालमत्तांची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोपी पुरूषोत्तम चव्हाण यांची मुंबईतील सदनिका, आरोपी राजेश बत्रेजा याची लोणावळा व खंडाळा येथील जमीन, अनिरुद्ध गांधींच्या कंपनीतील रक्कम, राजेश शेट्टीच्या विमा योजना, भूषण पाटील याच्या बँकेतील मुदत ठेवी अशी एकूण १४ कोटी दोन लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात अथवा त्यांच्यावर टाच आणण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १८२ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. या प्रकरणात माजी वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल अधिकारी, त्यांचे साथीदार भूषण पाटील, राजेश शेट्टी, राजेश बत्रेजा व चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. २००७-०८ आणि २००८-०९ या आर्थिक वर्षांसाठी बनावट परतावा जारी केल्याप्रकरणी अतिरिक्त महासंचालक (दक्षता)-४ सीबीडीटी यांनी लेखी तक्रारी केली होती. त्याप्रकरणी दिल्ली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने केलेल्या तपासानुसार, १५ नोव्हेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत अधिकाऱ्यांनी एकूण १२ बनावट टीडीएस परताव्यांद्वारे २६३ कोटी ९५ लाख ३१ हजार ८७० रुपयांचा गैरव्यवहार केला. ती रक्कम भूषण पाटील याच्या मालकीच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली. ती रक्कम पुढे भूषण पाटील व इतर संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये, तसेच बनावट कंपन्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी राजेश बत्रेजाने ही रक्कम इतरत्र वळवण्यास आरोपींना मदत केली.

हेही वाचा…अकरावी प्रवेश प्रक्रिया : तिसरी प्रवेश यादी २२ जुलै रोजी जाहीर होणार, १४ ते १७ जुलै दरम्यान महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेश बत्रेजा आणि पुरुषोत्तम चव्हाण नियमितपणे संपर्कात होते आणि हवाला व्यवहार व गुन्ह्यातील रक्कम वळवण्याशी संबंधित संदेशही एकमेकांना केल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.