मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मुंबईत केलेल्या कारवाईत सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड, महागड्या मोटरगाड्या, दागिने आदी मुद्देमाल जप्त केले. डब्बा ट्रेडिंग मोबाइल ॲप्लिकेशनप्रकरणी ईडीने मुंबईत चार ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणात सहभागी हवाला ऑपरेटरची माहिती ईडीच्या हाती लागली आहे.
मुंबईत चार ठिकाणी छापे टाकण्यात आले असून या कारवाईत सव्वातीन कोटींची रोकड, महागड्या मोटरगाड्या, दागिने, परदेशी चलन, पैसे मोजण्याचे यंत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा मोबाइल डब्बा ट्रेडिंग ॲप प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. याप्रकरणी ॲप्लिकेशन चालवणाऱ्यांना मिळणारा नफा व हवाला ऑपरेटरचा सहभाग याबाबतची माहिती मिळाली असून त्याची पडताळणी सुरू आहे. इंदोर येथील लसुदिया पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली.
डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय ?
शेअर बाजारातील निर्देशांक व समभागांवर बेकायदा गुंतवणूक व ट्रेडिंग केले जाते. शेअर मार्केटमधील निर्देशांकांवर सट्टा लावला जातो. शेअर बाजाराच्या विश्वात हा प्रकार डब्बा ट्रेडिंग म्हणून प्रचलित आहे. त्यात सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून बेकायदा रोखीचे व्यवहार केले जातात. त्यामुळे सरकारचा महसूलही बुडतो. डब्बा ट्रेडिंगची उलाढाल पाहता आरोपींनी सिक्युरिटी ट्रान्झॉक्शन, कॅपिटल गेन, सेबी टर्नओव्हर, एक्स्चेंज ट्रान्झॉक्शन अशा विविध करांच्या रूपात केंद्र व राज्य सरकारचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवण्यात येतो. ऐरवी १० लाखांच्या शेअर्सची खरेदी व विक्री केल्यास विविध करांच्या स्वरूपात सुमारे एक हजार रुपये दिले जातात. पण डब्बा ट्रेडिंगमध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार रोखीने झाल्यामुळे त्यात काळा पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळानुसार डब्बा ट्रेडिंगमध्येही अनेक बदल झाले आहेत. पूर्वी एखाद्या डायरीवर खरेदी विक्रीच्या नोंदी व्हायच्या. काळानुसार त्यासाठी लॅपटॉपचा वापर होऊ लागला. आता थेट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डब्बा ट्रेडिंग चालते.
टोपण नावाचा वापर
डब्बा ट्रेडिंगवर करण्यापूर्वी सट्टेबाज व पंटर टोपणनावाने त्यांचे बुक ओपन करतात. या अकाउंट बुकमध्ये, डायरीत अथवा लॅपटॉपमध्ये याच टोपणनावाची नोंद केली जाते. पण नवीन प्रणालीमध्ये मोबाइल अथवा वेब ॲप्लिकेशनचा वापर केला जात आहे. ई-मेलप्रमाणे सट्टेबाज, पंटर यांना लॉग इन आयडी व पासवर्ड दिला जातो. त्याद्वारे सर्व व्यवहार चालतो. जुन्या काळात छोट्या वहीमध्ये जिंकलेल्या व हरलेल्या पैशांचा संपूर्ण हिशेब ठेवला जायचा. त्यानंतर हवालामार्फत या पैशाची देवाण-घेवाण केली जायची. सट्टेबाज नोंदवहीऐवजी लॅपटॉपचा वापर करीत आहेत. मुंबईतील व्यक्तीकडून सट्टा घेणे शक्य झाल्यामुळे सट्टेबाजांना पकडणे कठीण झाले आहे.