मुंबईः सरकारी घर व कंत्राट देण्याच्या बहाण्याने दोन व्यावसायिकांची ३२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली व्यावसायिक पुरुषोत्तम चव्हाण यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवा एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. त्या प्रकरणी ईडीने सोमवारी शीव येथील तक्रारदार व्यावसायिकाचा जबाब नोंदवला, तसेच या प्रकरणातील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली. आरोपी पुरूषोत्तम चव्हाण हे पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती आहेत.
चव्हाण यांनी सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह इतरांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून फेब्रुवारी महिन्यात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी तक्रारदाराचा जबाब नोंदवला. तसेच गुन्ह्यांसंंबंधी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी चव्हाण यांनी शीव येथील व्यावसायिकासह १९ जणांकडून एकूण २४ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
ईडी या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रकमेचा माग काढत आहे. गैरव्यवहारातील रक्कम कोणाच्या खात्यावर गेली. तसेच ती कोठे गुंतवणूक करण्यात आली. याबाबत ईडी तपास करीत असून त्यांनी सोमवारी या प्रकरणीतील तक्रारदाराकडून संपूर्ण व्यवहाराची माहिती घेतली. या व्यवसायिकाला सरकारी कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच आरोपीने त्यांना सदनिकाही उघडून दाखवली होती, असा आरोप आहे. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने नुकताच गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.