मुंबई : वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने शनिवारी दुपारी जाहीर केले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी शनिवार, २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सोमवारपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते.
यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २६ जून २०२५ रोजी पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालयामधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी २६ जून २०२५ ऐवजी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असताना शिक्षण संचालनालयाने शनिवार, २८ जून रोजी दुपारी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार शनिवार, २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३० जून ते ७ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले.
दरम्यान, अकरावी प्रवेशाची २६ जून रोजी जाहीर होणारी गुणवत्ता यादी न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र शिक्षण संचालनालयाने दोन दिवस अगोदरच यादी जाहीर केली आहे.