मुंबई : करोना काळानंतर राज्यातील ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभर केलेल्या ‘अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) या सर्वेक्षणात पाचवीतील साधारण ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी आली नाही तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नाही.

पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे. करोनाकाळापूर्वी झालेल्या (२०१८) सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेत किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे. पायाभूत सुविधांची उपलब्धताही कमी झाली आहे.

हेही वाचा – मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवरही आरामदायक पाॅड हाॅटेल उभे राहणार, येत्या १५ दिवसांत फेरनिविदा मागविणार

प्रथम फाउंडेशनच्या वतीने देशभरातील शालेय शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात येते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांतील आवश्यक क्षमता आत्मसात केल्या आहेत का, याची पाहणी या उपक्रमामध्ये करण्यात आली. दरवर्षी करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात करोना काळात खंड पडला होता. यापूर्वी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाहणी करण्यात आली. त्यानंतर यंदा (२०२२-२३) या वर्षातील शैक्षणिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. करोना काळात विद्यार्थी शाळांपासून दुरावले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर झाल्याचे दिसून येते आहे. मात्र, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसते आहे. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्यापेक्षा कमी आहे, तर १५-१६ वयोगटातील म्हणजे माध्यमिक वर्गातील साधारण १.५ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य आहेत.

वाचन क्षमता घटली

साधारण दहा ते बारा साध्या सोप्या वाक्यांचा परिच्छेद दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणे अपेक्षित आहे. त्यानुसार ‘एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले. आजीला तिने तिच्या घरी पूजेला बोलावले होते. आजीने आपल्या सामानाचे गाठोडे बांधले… ’ अशा स्वरुपाचा परिच्छेद विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देण्यात आला. मात्र, पाचवीतील साधारण ४४ टक्के आणि आठवीतील २४ टक्के विद्यार्थी तो परिच्छेद वाचू शकले नाहीत. आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणार; २६ फेब्रुवारी रोजी पहिली मॅरेथॉन प्रोमो रन

वजाबाकी, भागाकाराशी फारकत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा (उदा. ४१- १३) करण्यास सांगण्यात आले. मात्र अशा स्वरुपाचे गणित अवघ्या १९.६ टक्के विद्यार्थ्यांना सोडवता आले. यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात (२०१८) असे गणित सोडवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३०.२ टक्के होते. आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले. (उदा. ५१९ भागिले ४) मात्र अशा स्वरुपाचे गणित सोडवू शकणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे ३४.६ टक्के होते. यापूर्वीच्या सर्वेक्षणात (२०१८) हे प्रमाण ४०.७ टक्के होते.