बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठी आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारपदासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला अखेर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बांधकामासाठी आठ तर सल्लागारपदासाठी अकरा कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. यामध्ये जागतिक स्तरावरील कंपन्यांचाही समावेश आहे. प्रत्यक्षात किती कंपन्या निविदा सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ३१ ऑॅक्टोबरनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा >>>मुंबई : तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; रोख १० लाख रुपये लुटून पोबारा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प २००४ मध्ये हाती घेण्यात आला. पुनर्विकासासाठी २००९, २०१६ आणि २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कधी निविदेला प्रतिसाद मिळाला नाही, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे निविदा रद्द करण्यात आली. तीन वेळा निविदा रद्द केल्यानंतर आता चौथ्यांदा जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या आहेत. सल्लागार आणि बांधकामासाठी अशा दोन स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या असून मंगळवारी निविदापूर्व बैठक पार पडली. या दोन्ही निविदांना कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. श्रीनिवास यांनी दिली.पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामासाठी आठ कंपन्यांनी तर सल्लागारासाठी अकरा कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. यात जागतिक स्तरावरील कंपन्यांचा समावेश आहे. दुबई, दक्षिण कोरिया या देशांतील आघाडीच्या कंपन्यांचा यात समावेश असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.