मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांना ४८ हप्त्यांमध्ये थकबाकीची रक्कम अदा करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची नुकतील बैठक पार पडली या बैठकीतील निर्णयानुसार २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच एसटी महामंडळाने याबाबत परिपत्रक राज्यभरातील एसटीच्या विविध विभागांना पाठविले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचारी खात्याने ३ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी करून थकबाकी वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. या निर्णयामुळे एैन दिवाळीच्या तोडांवर एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरकाची थकबाकीची रक्कम ५,००१ रुपये ते २५ हजार रुपयांदरम्यान आहे, त्यांना ती ५ हप्त्यांमध्ये अदा करण्यात येईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरकाची थकबाकीची रक्कम २५,००१ रुपये वा त्याहून अधिक आहे, त्यांना ती ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये अदा केली जाईल. या वाटपाला डिसेंबर २०२५ च्या वेतन कालावधीपासून सुरुवात होणार आहे.
सेवानिवृत्तांना भविष्य निर्वाह निधी, उपदानाची रक्कम मिळणार
एसटी महामंडळाच्या परिपत्रकात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही दिलासा दिला आहे. १ एप्रिल २०२० नंतर सेवानिवृत्त झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे सेवेतून कमी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या मूळ वेतनात झालेल्या वाढीमुळे अनुज्ञेय असलेला भविष्य निर्वाह निधी आणि उपदानातील फरकाच्या रकमेची परिगणना करण्यात येईल. त्यानुसार ही रक्कम अदा करण्यात येणार आहे, असे स्पष्ट निर्देश महामंडळाने दिले आहेत. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या थकबाकीचा प्रश्न मार्गी लावल्याने एसटी कामगार संघटनांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयामुळे आर्थिक संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या मान्यतेने हे परिपत्रक तात्काळ अंमलबजावणीसाठी सर्व प्रादेशिक कार्यालये आणि विभाग नियंत्रकांना प्रसारित करण्यात आले आहे.
