Raj Thackeray : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल आकारला जाणार नाही. याबाबत राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.

हे पण वाचा- Raj Thackeray : “शरद पवार फोडाफोडीच्या गोष्टी कशा करतात? ज्यांनी…”, राज ठाकरेंची तिखट शब्दांत टीका

किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि..

पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

टोलच्या आंदोलनाचं काय झालं हे विचारलं तर..

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका.
पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

राज ठाकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरेंनी या प्रश्नावरुन आंदोलन केलं होतं. तसंच मनसेने मुंबईतल्या सिग्नलवर नजर ठेवण्याचं कामही केलं होतं. आता राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांचं अभिनंदन केलं आहे.