मुंबई : ‘ऑपरेशन सिन्दूर’च्या यशानंतर भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने (शिंदे) महारक्तदान यात्रेचे श्रीनगर येथे रविवारी आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैन्यदलाच्या रुग्णालयास भेट देऊन स्वत: रक्तदान केले.

सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी ‘सिंदूर महारक्तदान यात्रे’ च्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान यात्रेमध्ये सहभागी आहेत. सैन्यदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी श्रीनगर येथील रक्तदानामध्ये भाग घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी सैन्यदलाच्या ९२ बेस रुग्णालयास भेट देऊन रक्तदान केले. सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. ‘तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो’ असे शिंदे यावेळी म्हणाले.