लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सण – उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमाच्या कालावधीत परिसर आकर्षक दिसावा म्हणून रस्त्यालगच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात येते. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे आणि मिरा -भाईंदर महापालिका तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, या विद्युत रोषणाईमुळे केवळ वृक्षांच्या वाढीवर परिणाम होत नाही तर, कीटक, पक्ष्यांसाठी हे घातक ठरतात. रात्रीच्या अंधारात अचानक प्रकाशझोत आल्यास वन्यप्राणी संभ्रमित होण्याचा धोका असतो.
वायू प्रदूषण, जल प्रदूषणाच्या समस्येला तोंड देत असतानाच प्रकाश प्रदूषणाकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सध्या रस्त्यावरील दिवे, व्यावसायिक फलक आणि वृक्षांवरील विद्युत रोषणाईमुळे विजेचा अपव्यय होत आहे. तसेच दिवसेंदिवस कृत्रिम प्रकाशाचे प्रमाण वाढत आहे. शहरातील झगमगाटीमुळे रात्री स्थलांतरित पक्षी बिचकतात. रात्रीच्या अंधारात अचानक प्रकाश पडल्यास वन्यजीव संभ्रमित होतात. प्रवाळासारखे समुद्री जीव प्रजनन थांबवतात. तसेच कासवाची अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले रात्री समुद्राकडे धाव घेतात, मात्र प्रकाशाचा अडथळा आल्यास मागे फिरतात आणि त्यातील अनेक पिल्ले मृत्युमुखी पडतात. पर्यावरण तज्ज्ञांनुसार प्रकाश प्रदूषणाचा वन्यजीव, पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होतो, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या
वृक्षांवरील विद्युत रोषणाई, दिवे यामुळे लहान कीटक विचलित होऊन संपूर्ण रात्र त्या प्रकाशाभोवती घिरट्या घालून थकून मृत्यू पावतात किंवा त्यातील जे काही जगतात, त्यांची प्रजनक्षमता कमी होते. वृक्षांवर रोषणाई केल्यामुळे अवेळी पानगळ होते.
प्रकाश प्रदूषणाचा पक्षी,प्राणी आणि मानवी जीवनावरही परिणाम होतो. विद्युत रोषणाई, डिजिटल फलक यामुळे पक्ष्यांची दृष्टी जाते, तसेच त्यांचा अपघात होतो. काही दिवसांपूर्वी पथदिव्यांमुळे नवी मुंबईतील नेरूळ जेट्टी परिसरात दिशादर्शक फलकाला आदळून ७ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना याचाच भाग आहे. -बी. एन. कुमार, पर्यावरण अभ्यासक, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन