मुंबई : दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील विजेच्या वापरात १३ टक्क्यांनी घट झाली. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) वीज बचतीच्यादृष्टीने केलेल्या उपाययोजनांमुळे विजेच्या वापरात घट होऊन १२.७९ कोटी रुपयांची बचत झाली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या संलचन, व्यवस्थापन, देखभाल – दुरुस्तीची जबाबदारी एमएमएमओसीएलकडे आहे. या मार्गिकेचे संचलन करताना प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सोयी – सुविधा उपलब्ध करतानाच पर्यावरण संवर्धन, हरित मुंबईचे उद्दिष्ट ठेवत अनेक उपक्रम राबविले जात असल्याचे एमएमएमओसीएलने सांगितले. याचाच एक भाग म्हणून वीज बचतीसाठी काही उपापयोजना करण्यात आल्या आहेत. स्थानकांमधील विजेचा अपव्यय कमी करण्यासाठी स्मार्ट लाईटिंगचा वापर करण्यात आला आहे. तर प्रवासी जवळ येताच सरकते जिने सुरु होतात. यासाठी इंटरमिटंट एस्केलेटरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक वातानुकूलित प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे सहा महिन्यांत विजेचा वापर कमी झाला. त्यामुळे विज बिलापोटी १२.८० कोटी रुपयांची बचत झाल्याचे एमएमएमओसीएलने सांगितले.
एप्रिल – सप्टेंबर २०२४ दरम्यान ४६,६३२,९६९ किलोवॅट विजेचा वापर झाला. त्यासाठी ३७.१४ कोटी रुपये अदा करावे लागले होते. तर एप्रिल – सप्टेंबर २०२५ दरम्यान ४०,४८९,८०० किलोवॅट विजेचा वापर झाला. त्यासाठी एमएमएमओसीएलने २४.३४ कोटी रुपये अदा केले. या उपाययोजनांमुळे वीज आणि पैशांची बचत झाली.
