मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट विद्युत केंद्रात विद्युत मीटर अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. नियोजनानुसार, मीटर जोडणीचे काम ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी १२.३० ते ३ या वेळेत करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतांश विभागातील पाणीपुरवठा सलग तीन दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवार, ७ ऑक्टोबर ते गुरूवार, ९ ऑक्टोबर या काळात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

या कालावधीत शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभाग, तसेच पूर्व उपनगरांतील एम – पूर्व आणि एम – पश्चिम विभाग परिसरात पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरांतील एल, एन विभागातील विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी या तीन दिवसांच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या भागातील पाणीपुरवठा बाधित होणार

शहर विभाग : १) ए – कुलाबा, कफ परेड, चर्चगेट, सीएसएमटी आदी. २) बी – डोंगरी, उमरखाडी, मोहम्मद अली रोड आणि आसपासचा परिसर, ३) ई – भायखळा आणि आसपासचा परिसर ४) एफ – दक्षिण – परळ आणि आसपासचा भाग ५) एफ – उत्तर – माटुंगा आणि आसपासचा भाग

पूर्व उपनगरे : १) एल – कुर्ला पूर्व क्षेत्र २) एम – पूर्व – मानखुर्द, गोवंडी ३) एम – पश्चिम – चेंबूर आणि आसपासचा परिसर ४) एन – विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर ५) एस – भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व क्षेत्र ६) टी – मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्र