काळबादेवी येथील ६३ वर्षीय व्यावसायिकाकडून १८०० ग्रॅम सोने चोरी केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी कर्मचाऱ्याला अटक केली. मालकाच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे तो अंत्यसंस्कारासाठी गावी गेला असताना आरोपीने चोरी केली. चोरी करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ९० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>>Andheri By Poll: ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मशाल भडकली आणि…”
आरोपी अजित संत्रा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून त्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली. तक्रारदार समरेंद्रनाथ पान हे आजारी असतात. त्यामुळे त्यांना नियमितपणे उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते. तक्रारीनुसार, मार्च २०१९मध्ये त्यांनी आपल्या बचतीतून दोन किलोग्राम सोने खरेदी केले होते. या सोन्यापैकी २०० ग्रॅम त्यानी विकले आणि झवेरी बाजार परिसरात एक छोटेसे दुकान खरेदी केले.विद्युत उपकरणांच्या या दुकानात कामासाठी व्यावसायिकाने पश्चिम बंगालमधील अजितला बोलावले. अजित तक्रारदाराच्या शेजारच्या गावातच राहत होता. अजितकडेही काम नसल्यामुळे त्याने तात्काळ होकार दिला. पण मुंबईत त्याला राहण्यासाठी परवाडणारे घर मिळत नव्हते. अजित शेजारच्या गावातील असल्यामुळे पान यांनी त्याला त्यांच्याच घरी राहण्यास सांगितले.
हेही वाचा >>>अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; म्हणाल्या “नोटाला मिळालेली मतं…”
व्यावसायिकाच्या आईचे ४ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील मिदनापूर गावी निधन झाले. अजितकडे घराच्या व दुकानाच्या चाव्या सोपवून तो गावाला गेला. ११ मे रोजी व्यावसायिक घरी परतला असता त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले १८०० ग्रॅम सोने गायब होते. अजितवर संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ त्याला दूरध्वनी केला. त्याने सुरूवातीला चोरी केल्याबाबत नकार दिला पण त्यानंतर त्याने ते सोने कोणालातही दिल्याचे सांगितले. तेथून ते पुन्हा मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली नाही. अखेर व्यावसायिकाला ब्रेन ट्युमर झाल्यामुळे त्याला वारंवार रुग्णालयात जावे लागत होते. त्याचा फायदा उचलून आरोपीने मुंबईतून पळ काढला. अखेर व्यावसायिकाने याप्रकरणी ३१ ऑक्टोबरला पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अजितला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने चोरलेले सोने जप्त करण्यासाठी एक पथक पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.