मुंबई : पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे वेळेत न भरणाऱ्या अभियंत्यांना प्रतिदिन एक हजार रुपये दंड करावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर ४८ तासांत ते बुजवले जातील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी वरील मागणी केली आहे.

पावसाळा तोंडावर आला असून खड्डे बुजविण्यासाठी आणि खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेने यंत्रणा तयार केली आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा होणार का, खड्डे वेळेवर बुजवले जाणार का हे पावसाळ्यातच समजू शकणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे पालिकेवर प्रचंड टीका होत असते. तसेच नागरिकांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंत्रणा तयार केली आहे. तसेच खड्ड्यांच्या तक्रारीसाठी अभियंत्यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले असून तक्रारीसाठी ॲपही तयार करण्यात आले आहे. याबाबत मकरंद नार्वेकर यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र पाठवले आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलीस सज्ज

खड्डे बुजविण्यासाठी पालिका अभियंते आणि कंत्राटदारांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. तसे न करणारे अभियंते आणि कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नार्वेकर यांनी केली. पालिकेकडे तक्रार आल्यानंतर ४८ तासांमध्ये खड्डा बुजविण्यात आला नाही, तर संबंधित अभियंत्यावर प्रतिदिन प्रति खड्डा एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. पालिकेने २२७ प्रभागांसाठी प्रत्येकी एक उपअभियंता आणि प्रत्येक परिमंडळासाठी एक कंत्राटदार खड्ड्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नियुक्त केले आहेत. हे जरी कागदावर चांगले असले तरी, निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारण्याची तरतूद असावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – मध्य, पश्चिम रेल्वे कोलमडली; सीएसएमटी स्थानकातील नव्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत त्रुटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेने खड्डे भरण्याच्या प्रक्रियेबाबत एक डॅशबोर्डही उपलब्ध करावा. या डॅशबोर्डवर नागरिकांनी केलेल्या तक्रारी, त्यावर केलेली कारवाई आणि खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य याबद्दल माहिती उपलब्ध व्हायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यंदा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले असून नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील लहान खड्ड्यांसाठी कोल्डमिक्स तर मोठ्या खड्ड्यांसाठी मास्टीकचा वापर करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विभागात खड्डे बुजवण्यासाठी तीन कूकर तयार ठेवण्यात आले असून त्यावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.