मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या ‘एमएमएस’ (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि ‘एमसीए’ (मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी २० जुलै २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत https://forms.epravesh.com/MumbaiUniversity/ या संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येईल.
‘एमएमएस’ आणि ‘एमसीए’ हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची पात्रता, शुल्क आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अधिक तपशील ‘आयडॉल’च्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
‘एमएमएस’ या अभ्यासक्रमासाठी ७२० एवढी प्रवेश क्षमता असून ‘एमसीए’ या अभ्यासक्रमासाठी २ हजार एवढी प्रवेश क्षमता आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी परवानगी दिली असून हा अभ्यासक्रम ‘एमबीए’ या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तर मनुष्यबळ (एचआर), वित्त (फायनान्स) व विपणन (मार्केटिंग) या तीन विषयांत एमएमएस हा अभ्यासक्रम करता येतो. एमसीए हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन ‘आयडॉल’चे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.