मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) माध्यमातून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात चालविण्यात येत असलेल्या ‘एमएमएस’ (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि ‘एमसीए’ (मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांसाठी रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे.

तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवार, २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पध्दतीने सराव परीक्षेचेही (मॉक टेस्ट) आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा तपशील (लिंक आणि लॉगिन क्रेंडेंशिअल्स ) विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलवर पाठविण्यात आले आहे.

‘एमसीए’ अभ्यासक्रमासाठी ६७० आणि ‘एमएमएस’ अभ्यासक्रमासाठी २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएमएस ऑनलाईन प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२.३० या दीड तासाच्या कालावधीत आयोजित केली जाणार आहे, तर एमसीए अभ्यासक्रमासाठीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा दुपारी २ ते ३ या एक तासाच्या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने प्रत्येकी १०० गुणांच्या असणार आहेत. या दोन्ही ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आलेल्या लिंक आणि लॉगिन क्रेडेंशिअल्सनुसार सराव परीक्षा आणि मुख्य प्रवेश परीक्षा द्यायची आहे, असे ‘आयडॉल’चे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.