मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती थाटात मंडपात विराजमान होत आहेत. या धामधुमीत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आणि मूर्तिकारांपासून कला दिग्दर्शकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा’ यंदाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबईचा राजा’ हा बहुमान देऊन गौरविण्यात येणार आहे.
विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ देण्यासाठी आणि मूर्तिकारांपासून कला दिग्दर्शकांच्या कलेला चालना देण्यासाठी दरवर्षी ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात येते. या स्पर्धेसाठी प्रवेशिका उपलब्ध झाल्या असून कुलाबा ते दादर, माहीम ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, विद्याविहार ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण आणि नवी मुंबई या ८ विभागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल.
दरम्यान, गणेशमूर्तीची कलात्मकता, सजावट, मांडणी, स्वच्छता, सजावटीचा विषय निवडताना ठेवलेला जागतिक, राष्ट्रीय, राज्य, स्थानिक पातळीवरील जनजागृतीचा विचार असणारी संकल्पना, मंडळाची गणेशोत्सवाव्यतिरिक्त समाजाभिमुख कार्यपद्धती, पर्यावरण रक्षणासाठीच्या योजना आणि संकल्पनेवर आधारित संहिता लेखन, प्रकाशयोजना, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा आवाज आदी विविध गोष्टी तपासून स्पर्धेच्या नियम व अटींच्या आधारे तज्ज्ञ परीक्षकांकडून पारितोषिकांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. तर परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
प्रवेशिका कधी व कुठे मिळणार?
‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२५’च्या प्रवेशिका १८, १९ व २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात मिळतील. त्या प्रवेशिका भरून २१, २२ व २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आणून द्यायच्या आहेत. या मुदतीनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. तसेच संहिता लेखनासाठी प्रवेश अर्जासह संहिता, लेखकाचे नाव आदी माहिती प्रवेश अर्जास जोडणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पुढील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा : धर्मेश म्हसकर – ९७७३१५४९२४
लोकसत्ताचे मुंबई व ठाणे कार्यालय
• मुंबई : लोकसत्ता, ७ वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइन्ट, मुंबई – ४०००२१
• ठाणे : ठाणे : द इंडियन एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, होषबोनू मेन्शन, ३ रा मजला, नौपाडा, गोखले रोड, ठाणे (पश्चिम) – ४००६०२
बक्षिसांचा वर्षाव
‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२५’मध्ये विभागवार पारितोषिकांसह सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान, ५१ हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विभागवार सर्वोत्कृष्ट मंडळ पारितोषिक ९ हजार ९९९ रुपये, विभागवार पर्यावरणस्नेही विशेष पारितोषिक ९ हजार ९९९ रुपये आणि विभागवार सर्वोत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, भव्य देखावा तयार करणाऱ्या विजेत्या मंडळास २ हजार १ रुपयांचे विशेष पारितोषिक मानचिन्ह आणि सन्मानपत्र. तसेच सहभागी सर्व मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.