मुंबई: मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले. मात्र त्यानंतरही दुपारी दोन वाजल्यानंतर मंत्रालयाबाहेरील प्रवेशासाठीच्या खिडक्यांवर प्रवेशपत्र घेऊन आत येणाऱ्यांची गर्दी काही कमी झाली नाही. यासाठीची लांबच लांब रांग एका प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारावर तर कधी थेट येथील भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचल्याने आता हे प्रवेशपत्रही देणे बंद करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपासून डीजीप्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्रालयात होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी चेहरा पडताळणी यंत्रणा बसविण्यात आली. त्याचबरोबर डीजी ॲपवर नोंद करून प्रवेशपत्र मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र ग्रामीण भागातून, गाव-खेड्यातून येणाऱ्या ज्या लोकांकडून अद्ययावत फोन नसतो त्यांना प्रवेश घेणे शक्य व्हावे यासाठी खिडकीवर प्रवेशपत्र देण्याची सुविधाही ठेवण्यात आली होती. मात्र १५ ऑगस्टपासून खिडकीवर प्रवेशपत्र मिळणार नाही. त्यानंतर अभ्यांगताना हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये दहा अंकी मोबाईल नंबर आणि नोंदणी केल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.

‘डीजी प्रवेश ॲप’च्या पूर्वी मंत्रालयात प्रवेशासाठी तासनतास रांगा लावाव्या लागत होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असे. मंत्री , आमदार, मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहायक यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. विशेषत: मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी या गर्दीचे प्रमाण वाढते. कित्येकदा ही रांग उद्यान प्रवेशद्वारापासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ते थेट भाजप कार्यालयापर्यंत जात असे. डीजी प्रवेश ॲप विकसित केल्यानंतरही ही गर्दी नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे १५ ऑगस्टपासून आता ऑफलाइन प्रवेश पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली. ज्यांच्याकडे स्मार्ट फाेन नसेल अशा व्यक्तींसाठी कोणती यंत्रणा राबवायची, कोणती कार्यप्रणाली विकसित करायची यावरही काम सुरू असून त्यांचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे निकम म्हणाले.