पर्यावरणवादी व कोळी समाजाचा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यास विरोध

मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी युती शासन व विशेषत भाजपने आपले घोडे पुढे दामटल्याने शहरातील पर्यावरणवादी व कोळी बांधव चिंतातूर झाले आहेत.  या स्मारकाचा मुख्यत्वे फटका हा कफपरेड येथील कोळी बांधवांना बसणार असून या कोळी बांधवांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधत त्यांच्या अचानक मित्रमंडळात शिवस्मारकाला विरोध करणारा देखावा उभा केला आहे.

मुंबईत शिवस्मारक बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून याविरोधात पर्यावरणवादी व कोळी बांधव एकत्र येत आहेत. इथून पुढेही सरकारला स्मारकाबाबतीत विरोध करणार असल्याचे मंडळाचे रवींद्र पांचाळ यांनी सांगितले. तसेच, सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे व अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केल्याने सरकारपुढील अडचणींमध्ये भर पडली. तसेच, स्मारक पाहण्यासाठी भविष्यात दहा हजार पर्यटक येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असून यासाठी वाहनतळ कसे उभारले जाईल यावर आणि गेट वे ऑफ इंडिया येथून स्मारकाकडे जाण्याचा मार्ग असल्याने पावसाळ्याचे चार-पाच महिने स्मारक पर्यटकांसाठी बंद ठेवणार का असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

स्मारकामुळे कोळ्यांचे अर्थकारण संपुष्टात येणार असून राजकारणपोटी त्यांना आयुष्यातून उठवण्याचा हा सरकारचा डाव आहे. मुंबईत अनेक पर्यायी जागा असून त्या जागांची निवड करावी. असे याचिकाकर्ते व मच्छिमारांचे नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले. तर, लोकानुनयासाठी पर्यावरण व सागरी वैविध्यतेची हानी होणार असून याविरोधात लढाई चालू ठेवणार असल्याचे याचिकाकर्ते व सागरी अभ्यासक प्रदिप पाताडे यांनी सांगितले.

आधीच संसाधनांच्या नावाखाली आपण भराव टाकण्याचे काम केले आहे. तसेच, स्मारकाचे काम सुरू झाल्यास आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करणार असल्याचे पर्यावरणवादी आनंद पेंढारकर यांनी सांगितले. तर, हे स्मारक होण्याआधी हे स्मारक त्याजागी योग्य आहे का, याची पाहणी करणे आवश्यक होते, असे सागरी संशोधक डॉ. विनय देशमुख म्हणाले.

* कफ परेड, मच्छिमार नगर – छोटय़ा मच्छिमार बोटी – ४५०

* स्मारकाच्या जागेजवळील मत्स्यसंपदा – लॉबस्टर, कोळंबी, तांब मासा, पाला, खेकडे

* वरळी, माहिम, लोटस, खारदांडा, गीता नगर येथून ७०० छोटय़ा मच्छिमार बोटी मासेमारी साठी स्मारकाच्या जागेच्या परिसरात मासेमारीसाठी येतात.

* कोळ्यांना स्मारक परिसरातील जागेतून अंदाजे मासिक १ लाखाच्या आसपास उत्पन्न