मुंबई : राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीची निवड यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये ३ हजार ६३३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. या फेरीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतरही विविध महाविद्यालयांमधील तब्बल १४ हजार ४५५ जागा रिक्त राहणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अन्य पर्यायांना पसंती दिल्यामुळे जागा रिक्त राहिल्या असून, आता चौथ्या आणि संस्थास्तरावरील फेरीमध्ये होणाऱ्या प्रवेशाकडे संस्थाचालकांचे लक्ष लागले आहे.

औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये १६ हजार ६०४, दुसऱ्या फेरीत ८ हजार ८०, तिसऱ्या फेरीत ३ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर चौथ्या फेरीत ३ हजार ६३३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना मान्यता मिळण्यास झालेल्या विलंबामुळे प्रवेश वेळापत्रक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलावे लागले. सीईटी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तब्बल चार महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागल्याने अनेकांनी इतर अभ्यासक्रम किंवा इतर राज्यातील पर्याय निवडले. त्यामुळे यंदाही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक असलेली फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) मान्यतेची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

दरम्यान, आता चौथ्या फेरीसह संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे. संस्थांना ११ नोव्हेंबरपासून रिक्त जागांची यादी आपल्या संकेतस्थळावर व वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून, गुणवत्तायादी तयार करून प्रवेश पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर असेल. त्यामुळे उर्वरित जागा किती भरल्या जातात, याकडे विद्यार्थ्यांसह संस्थांचेही लक्ष लागले आहे.