उपनगरात प्रवाशांची गर्दी, शहरात घट

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील प्रवासी संख्येतही वाढ

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ठाणे, डोंबिवली, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा रेल्वे स्थानकात गर्दी वाढली; एल्फिन्स्टन रोड स्थानकातील प्रवासी संख्येतही वाढ

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरातील स्थानकांवर गेल्या काही वर्षांत गर्दी वाढली आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या प्रवासी संख्येच्या नवीन आकडेवारीनुसार ठाणे, डोंबिवली, अंधेरी, बोरिवलीबरोबरच नालासोपारा स्थानकातील प्रवासी संख्येत  वाढ झाली आहे. ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली असून ती दोन लाख ४३ हजार ५०४ वरून दोन लाख ५६ हजार १४९ वर पोहोचली आहे. तर त्याखालोखाल नालासोपारा स्थानकातील प्रवासी संख्या दोन लाख १६ हजारावरून थेट दोन लाख ३१ हजार ७८९ झाली आहे.  महत्त्वाची बाब म्हणजे एकेकाळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारी मध्यवर्ती शहरी रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरू लागली आहे. यामधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते परळ आणि चर्चगेट ते महालक्ष्मीपर्यंतच्या स्थानकातील गर्दीत घट झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय रेल्वेचा पसारा खूपच मोठा आहे. पश्चिम रेल्वे चर्चगेटपासून डहाणू तर मध्य रेल्वे सीएसएमटी ते कर्जत, कसारा, खोपोली आणि पनवेलपर्यंत आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील स्थानकातील दररोजच्या प्रवासी सख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरांतील स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर शहर भागांतील रेल्वे स्थानकातील दररोजच्या प्रवासी संख्येत कमालीची घट होऊ लागली आहे.

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील बोरिवली हे गर्दीचे स्थानक ठरले आहे. सध्या या स्थानकातून दोन लाख ८२ हजार १४० प्रवासी दररोज प्रवास करतात. त्याआधीच्या वर्षांत हीच संख्या दोन लाख ८१ हजार ४७८ एवढी होती. त्याखालोखाल अंधेरी स्थानकाचा नंबर लागत असून दोन लाख ५१ हजार १२९ असणारी प्रवासी संख्या दोन लाख ५६ हजार ५६१वर पोहोचली आहे. बोरीवली पुढील नालासोपारा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत तर मोठी वाढ आहे. आधीच्या वर्षी दोन लाख १६ हजार ७९ असलेल्या प्रवाशांची संख्या थेट दोन लाख ३१ हजार ७८९ झाली आहे. मध्य रेल्वेवरही हीच परिस्थिती पाहण्यास मिळते. याआधी ठाणे स्थानकातून दररोज प्रवास करणारी प्रवासी संख्या दोन लाख ४३ हजार ५०४ होती. तीच आता दोन लाख ५६ हजार १४९ झाली आहे. डोंबिवलीतून दोन लाख ४२ हजार ३९७ वरून आता दोन लाख ४७ हजार २०६ आणि दिवा स्थानकाची ९३ हजार ६०५ ही पूर्वीची प्रवासी संख्या वाढून तिने एक लाखाचा आकडाही पार केला आहे.

एल्फिन्स्टन रोडही गर्दीचे

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर या स्थानकातील गर्दीही वाढली आहे. सध्या याच स्थानकातून रोज ८१ हजार २२० प्रवासी प्रवास करतात. या आधी ७८ हजार ७८३ प्रवासी प्रवास करत होते.  रेल्वेने या स्थानकातील सुविधांकडे आता लक्ष केंद्रित केले आहे.

शहर स्थानकांतील गर्दी ओसरली

मुंबई शहरांतील चर्चगेट ते लोअर परळ आणि सीएसएमटी ते परळर्पयच्या स्थानकातील प्रवासी संख्येत घट झाली आहे. सीएसएमटीतून याआधी एक लाख ४९ हजार ४६८ प्रवासी प्रवास करत असतानाच आता एक लाख ४४ हजार ९८१ प्रवासी प्रवास करत असल्याची नोंद आहे. मस्जिद, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ स्थानकातही हीच परिस्थिती आहे. परळ स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २६ हजारांवरून २५ हजार ११६वरआली आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील प्रवासी एक लाख सहा हजारांवरून एक लाख दोन हजार २४१वर आणि महालक्ष्मी स्थानकातील प्रवासीसंख्या ४४ हजारांवरून ४३ हजारांपर्यंत झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Every day increase population in mumbai

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या