मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिदृष्टय़ा अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत. तसेच त्यांच्या सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी गुरुवारी केले.

‘ईव्हीएम’ चुकीचे मत नोंदवू शकत नाही यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांची माहिती करून घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील ६१.३ कोटी मतदारांनी १० लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवरून ईव्हीएमच्या साहाय्याने मतदान केले आणि व्हीव्हीपॅटवर त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री केली आहे. तसेच प्रत्येक ईव्हीएम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासली आणि सीलबंद केली जाते. तसेच त्यांचे प्रतिनिधी मशीनच्या सीलवर स्वाक्षरी करतात.  ईव्हीएमचे सर्व मतदारसंघ आणि मतदान केंद्रांना सरमिसळ करून वाटप करण्यात येत असल्यामुळे कोणती मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रात पाठविली जाणार याविषयी पूर्वकल्पना नसते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्यादिवशी निश्चित होते. तोपर्यंत उमेदवाराला ईव्हीएमवरील कोणत्या क्रमांकाचे बटन दिले जाईल याचाही अंदाज बांधता येत नाही, असे सांगून सिंह म्हणाले, मतदान केंद्रावर वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमचा अनुक्रमांक हा प्रत्येक उमेदवाराला दिला जातो. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधी, अभिरूप  मतदान घेण्यात  येते. ज्यामध्ये प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी स्वत: मत नोंदवतात व ईव्हीएमवर निकाल पाहून १०० टक्के व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करतात. त्यांच्या प्रमाणिकरणानंतरच प्रत्यक्ष मतदान सुरू होते.

लोकसभा निवडणुकीत एक कोटींपेक्षा अधिक मतदान प्रतिनिधींनी या यंत्रांना प्रमाणित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evm technically safe says chief election officers zws
First published on: 02-08-2019 at 04:01 IST