मुंबई: गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता माजी सैनिकांना नियुक्त करण्यात येणार आहे. पर्यटन विभागाकडून पर्यटक सुरक्षा बल (पर्यटन मित्र) हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या दोन समुद्र किनाऱ्यांवर हा प्रयोग केला जाणार असून पर्यटन धोरण योजनेंतर्गत माजी सैनिकांची याठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. या माजी सैनिकांद्वारे या दोन्ही ठिकाणी ग्रस्त घालण्यात येणार आहे.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटवर रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटक आणि मुंबईकरांची मोठी गर्दी असते. पर्यटकांकडून कधी आततायीपणा करून पाण्यात उतरण्याची जोखीम घेतली जाते. अशावेळी या ठिकाणी कायम जीवन रक्षक असतीलच असे नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी, देखरेख ठेण्यासाठी महाराष्ट्र पूर्व सैनिक महामंडळ (मेस्को) यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्यटन स्थळी सुरक्षा बल तैनात केले जाणार आहे.
महिला व पुरुष अशा दोन्ही सुरक्षा रक्षकांचा यात समावेश असेल. अद्याप नेमके किती माजी सैनिकांची नियुक्ती केली जाणार याबाबतचा अंतिम निर्णय मेस्कोबरोबर चर्चा करून घेण्यात येणार आहे. मात्र सुरक्षा रक्षकांसाठी विशेष गणवेश, आठ तासांची ड्यूटी आणि मानधनाची तरतूद पर्यटन विभागामार्फत केली जाणार असून पर्यटन धोरणात तशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार यांनी दिली.
परदेशी पर्यटकही या ठिकाणी भेट देत असल्याने पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाइन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सुरक्षा दलाच्या नेमणुकीमुळे देश-विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल. पर्यटक सुरक्षा बल केवळ पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करणार नाही, तर त्यांना संबंधित पर्यटनस्थळ, संस्कृती, इतिहास आणि परंपरांबाबत माहिती देणार आहे. त्याचबरोबर स्वच्छता राखणे, प्लास्टिक व कचऱ्याचा वापर टाळणे याबाबतही जनजागृती केली जाईल. महाबळेश्वर महोत्सवात यापूर्वी २५ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. साताऱ्यातील पाचगणी येथेही पर्यटक सुरक्षा बल यशस्वीपणे कार्यरत आहेत. आता मुंबईत हा प्रयोग मुंबईत केला जाणार असून राज्यातील इतर प्रमुख पर्यटनस्थळांवर ही योजना विस्तारली जाईल, असे पोवार यांनी सांगितले.