मुंबई : केंद्र शासनाने २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरु करून रुग्णांच्या उपचारांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र केवळ रुग्णांची संख्या मोजून हा आजार आटोक्यात येणार नाही. क्षयरोगामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूमागचे कारण समजून घेण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी, मातामृत्यू विश्लेषण मॉडेलप्रमाणे क्षयरोग मृत्यू विश्लेषण बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे ठाम मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच क्षयरोग म्हणजे टीबी हा केवळ आरोग्याचा विषय नसून त्यासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय बांधिलकीही आवश्यक आसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सध्या भारतात लाखो रुग्ण क्षयरोगाच्या विविध प्रकारांमुळे ग्रस्त आहेत. सरकारने ‘निक्षय’ प्रणालीद्वारे रुग्णांची नोंदणी व औषधपुरवठा सुलभ केला आहे, परंतु हजारो रुग्ण अजूनही या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. भारत सरकारच्या माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या मते हे मृत्यू टाळता येण्यासारखे होते का, याचा सखोल तपास करणे काळाची गरज आहे. त्यांच्यानुसार, जसे आपण मातामृत्यूच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक मृत्यूची वैद्यकीय, सामाजिक, पोषणात्मक कारणांसह सखोल डेथ ऑडिट करतो, तशीच प्रक्रिया क्षयरोग मृत्यूंसाठीही राबवली पाहिजे.
क्षयरोग मृत्यूचं ऑडिट करण्यासाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समित्या तयार करून त्या प्रत्येक मृत्यूचं विश्लेषण करावं. या समित्यांमध्ये आरोग्य अधिकारी, क्षयरोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रयोगशाळा तज्ज्ञ, पोषण सल्लागार, आणि आरोग्य सेवा पुरवठादार यांचा समावेश असावा. त्या समिती मृत्यूचे कारण निश्चित करतील, भविष्यात तो मृत्यू टाळता आला असता का हे पाहतील, आणि त्यावर उपाययोजना सुचवतील असे डॉ स्वामिनाथन यांनी सांगितले.
भारतात २०२३ मध्ये २५.५ लाख रुग्ण आणि २०२४ मध्ये २६.०७ लाख रुग्णांचे निदान झाले असून २०२५ च्या पहिल्या ८१ दिवसांत म्हणजे १ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत ५,७७,७१२ नवे क्षयरुग्ण नोंदविण्यात आले आहेत. भारतात क्षयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त असून जगातील एकूण क्षयरुग्णांच्या तुलनेत भारतात २७-२७ टक्के क्षयरुग्ण आहेत. याला व्यापक प्रमाणात अटकाव करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे माजी आरोग्य महासंचालक डॉ सुभाष साळुंखे यांनी याप्रकरणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार क्षयरोग मृत्यूंचे विश्लेषण केल्याने धोरणात्मक सुधारणांमध्ये मदत होईल. मृत्यू कोणत्या वयोगटात झाला, रुग्ण स्त्री होता की पुरुष, तो गरीब होता की नाही, कुपोषित होता का, निदान लवकर झाले होते की उशीर झाला, औषधोपचार चालू होते की खंडित झाले हे सर्व तपशील समजून घेतल्याशिवाय आपण केवळ आकड्यांच्या खेळात अडकतो, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. या ऑडिटमध्ये निदानात झालेला विलंब, एमडीआर टीबी किंवा एक्सडीआरची उपस्थिती, औषधांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न, कुटुंबातील पाठिंबा, पोषणस्थिती, आणि रुग्णाच्या स्थलांतराच्या स्थितीचा विचार केला पाहिजे.
विशेषतः स्थलांतरित मजुरांमध्ये, झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांमध्ये, आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये टीबी मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचे आयसीएमआरच्या २०२२ च्या अहवालात नमूद केले गेले आहे. पण यासाठी आरोग्याला पुरेसे बजेट केंद्र व राज्य सरकार देणार आहे का, असा सवालही डॉ साळुंखे यांनी उपस्थित केला. आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती सक्षम केली आहे असा सवाल करत क्षयरोग नष्ट होणे शक्य नाही तर तो नियंत्रणात आणता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
क्षयरुग्ण ही सामाजिक बांधिलकीही आहे
क्षयरोग मृत्यूंच विश्लेषण ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बांधिलकी देखील आहे. पण जागरूकता, पोषण, आणि सामाजिक आधार या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित केल्याशिवाय टीबी निर्मूलनाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आज जर आपण मृत्यूंच्या आकडेवारीकडे केवळ संख्या म्हणून न पाहता, त्या मागचं वास्तव पाहू लागलो, तर आपण टीबी विरुद्धच्या लढ्यात खऱ्या अर्थाने एक पाऊल पुढे जाऊ शकू असेही डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितल.
परदेशात टीबी मृत्यूंचे डेथ ऑडिट प्राधान्याने केले जाते तसेच ते भारतातही होणे अत्यंत आवश्यक असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. या मृत्यू विश्लेषणाच्या प्रक्रियेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोषणाचे महत्त्व. भारतातील टीबी रुग्ण हे मोठ्या प्रमाणात कुपोषित असतात, आणि पोषणाची योग्य साथ मिळाली नाही, तर औषधंही प्रभावी ठरत नाहीत. भारत सरकारच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. परंतु अनेक राज्यांमध्ये ही मदत वेळेवर पोहोचत नाही. रुग्णांना केवळ औषधेच नव्हे, तर प्रत्यक्षात आहार, जीवनशैली बदल, आणि मानसशास्त्रीय सल्लाही पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. टीबी नष्ट करणे शक्य नसले तरी नियंत्रणात नक्कीच आणता येऊ शकतो असेही डॉ सुपे यांनी सांगितले.