scorecardresearch

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता.

Case Against Nawab Malik
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलीय (फाइल फोटो)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर…

आधी दाऊदच्या भावाला अटक…
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.

पहाटे पाचलाच मलिक यांच्या घरी पोहचले ईडी अधिकारी…
मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवानही त्यांच्याबरोबर होते. या कारवाईबाबतची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नाही. त्यावेळी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी करायची असल्याचे सांगून ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी मलिक यांना त्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. मलिक यांनी काही वेळ मागून घेतला. त्यानंतर ते ‘ईडी’ कार्यालयाकडे निघाले. त्यावेळी त्यांचे पुत्र आमीर हे त्यांच्याबरोबर होते. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली.

ईडीने न्यायालयात काय दावा केला?
‘ईडी’ने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता (एएसजी) अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून ३ फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली. कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे (मनी लॉन्डिरग) असल्याचा दावा ‘ईडी’ने १४ दिवसांची कोठडी मागताना केला.

मलिक यांच्यावर ३०० कोटींच्या संपत्तीसंदर्भातील नेमके आरोप काय?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.

जमिनीची मालक मलिक यांच्या कंपनीकडे कशी गेली?
मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकटय़ा वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे (शेड) या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र, या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली, त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ‘ईडी’ला जबाबात सांगितले.

हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका
या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ‘ईडी’ने खानचा जबाबही नोंदवला आहे. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील ‘पॉवर ऑप अ‍ॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली, असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या, त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained the case against nawab malik and dawood link scsg

ताज्या बातम्या