Tender For expressway between Vaadhavan Port to Tawa by NHAI: देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वरोर, वाढवण – तवा दरम्यान ३२.१८० किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या महामार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी एनएचएआयकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२५७५.०८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करत महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन एनएचएआयचे आहे. तर काम सुरु झाल्यापासून अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही एनएचएआयचे आहे. तर हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वरोर, वाढवण ते तवा हे अंतर दीड तासांऐवजी ३० मिनिटांत पार करता येणार आहे.
पालघरमधील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर बांधले जाणार असून सध्या बंदरस्थळी पोहचण्यासाठी थेट रस्ता नाही. तवा येथून पालघर आणि मग पुढे वरोरवरून वाढवण बंदर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पोहोचावे लागते. यासाठी किमान दीड तास लागतो. या पार्श्वभूमीवर एनएचएआयने वरोर, वाढवण ते तवा असा ३२.१८० किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यातून वाहनांना वाढवण बंदराला पोहचता यावे यासाठी वरोर, वाढवण ते तवा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाशी तवा ते भरवीर महामार्गाने जोडला जाणार आहे.
महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तवा ते भरवीर महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. अशात आता वरोर, वाढवण ते तवा या महामार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी एनएचएआयने निविदा प्रसिद्ध केली आहे. ३ सप्टेंबर ते २२ आॅक्टोबरदरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत. ही निविदा प्रक्रिया येत्या काही महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एनएचएआयचे आहे. एकीकडे या महामार्गासाठी एनएचएआयने आता निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. तर दुसरीकडे भूसंपादनालाही वेग दिला आहे.
वरोर, वाढवण ते तवा महामार्गासाठी २४ गावांमधील ६०० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यानुसार २४ गावांपैकी २२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. तर ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. तेव्हा निविदा प्रक्रिया पूर्ण करत कंत्राट अंतिम करत, ९० टक्के भूंसपादन पूर्ण करत नव्या वर्षात या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन एनएचएआयचे असल्याची माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
निविदेनुसार या महामार्गासाठी २५७५.०८ कोटी रुपये खर्च येणार असून काम सुरु झाल्यापासून अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास तवा ते वरोर, वाढवण अंतर दीड तासांऐवजी केवळ ३० मिनिटांत पार करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे वाढवण बंदरापर्यंत वाहनांना अतिजलद आणि सुकरपणे पोहचता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात आहे.