शैलजा तिवले
रुग्णांची लुबाडणूक केल्याप्रकरणी कारवाई
आयुषमान भारत योजनेसोबतच राज्यभरात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मुंबईसह राज्यातील ३६ रुग्णालयांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
रुग्णांची लुबाडणूक करणे, बिले वाढवून दाखविणे या कारणास्तव या रुग्णालयांना योजनेतून वगळण्यात आले आहे. मुंबईतील बालाजी रुग्णालयाचाही यामध्ये समावेश आहे. ६ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत या ३६ रुग्णालयांना योजनेतून वगळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर (९), मुंबई शहर (४), उपनगर (५), अमरावती (२), रायगड (२), ठाणे (१), नागपूर (५), नगर (३), जळगाव (१), नाशिक (२), सांगली (१), सोलापूर (१) या रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. पुणे, औरंगाबाद, नांदेड, लातूरच्या प्रत्येकी एका रुग्णालयाला निलंबित केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेस पात्र असूनही रुग्णांकडून पैसे उकळलेल्या रुग्णांलयाकडून गेल्या पाच महिन्यात अडीच कोटी रुपये रुग्णांना परत केले आहेत.
..अखेर बालाजी रुग्णालय बाद
मेमधील झाडाझडतीमध्ये रुग्णांची लुबाडणूक केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या भायखळा येथील बालाजी रुग्णालयाला या योजनेतून बाद केले आहे. वैद्यकीय साधनांची बनावट बिले, रुग्ण जास्त काळ रुग्णालयात दाखल असल्याची आणि शस्त्रक्रियेचीही बनावट कागदपत्रे या रुग्णालयाने सादर केली होती. २०१५ मध्ये रुग्णालयाविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. रुग्णालयाची योजनेतून हकालपट्टी होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रमेश कागझी यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचीही वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा आहे. यासंबंधी डॉ. रमेश कागझी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेला नाही.