लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी दहा टक्के कमिशन देण्याची तयारी दाखवून चार आरोपींनी व्यापाऱ्याकडील एक कोटी रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी गोवंडी परिसरात घडली होती. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. एक व्यापारी चलनातून रद्द झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी दहा टक्के कमिशन घेत असल्याची माहिती आरोपीना मिळाली होती. त्यानुसार आरोपींनी व्यापाऱ्याशी संपर्क साधून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्याला गोवंडीतील दत्तगुरू सोसायटी परिसरात बोलावले. दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बदल्यात व्यापारी आरोपीना पाचशे रुपयांच्या नोटा देणार होता. व्यापारी एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन ठरलेल्या ठिकाणी आरोपींना भेटला. मात्र आरोपींनी दोन हजार रुपयांच्या नोटा देताच व्यापाऱ्याकडील एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. याबाबत व्यापाऱ्याने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

आणखी वाचा-मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खचला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी हसन कुरेशी (३१), उबेद कुरेशी (३६), किरण फणसे (३१) आणि गुरुनाथ गायकर (३१) या चौघांना विविध भागातून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोटारगाडी आणि १४ लाख रुपये हस्तगत केले असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.