महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७०१ किमी लांबीच्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागविलेल्या निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर – शिर्डीदरम्यानचा ५२० किमी लांबीचा टप्पा ११ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून या महामार्गावर खानपानासह अन्य आवश्यक सुविधा नसल्याने वाहनचालक – प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या सुविधा शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुसरीकडे निविदा प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची नामु्की एमएसआरडीसीवर ओढवली असून या सुविधा उपलब्ध करण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>घर घेऊ इच्छिणाऱ्यांना म्हाडाकडून नववर्षांची भेट

समृद्धी महामार्गामुळे नागपूर – शिर्डी प्रवास अतिजलद झाला आहे. चारचाकी वाहने पाच तासांत अंतर कापत आहेत. मात्र सुविधांचा अभाव असल्यामुळे या प्रवासादरम्यान वाहनचालक – प्रवाशांची गैरसोय होत आहे. या महामार्गावर फूड प्लाझा, प्रसाधनगृह, वाहन दुरुस्तीची व्यवस्था आणि अन्य सुविधाच नाहीत. या सुविधा विकसित न करताच पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. वाहतूक सुरू झाल्यानंतर आता ७०१ किमी लांबीच्या महामार्गावर १६ ठिकाणी फूड प्लाझा आणि इतर सर्व आवश्यक त्या सुविधा विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या आहेत. २३ डिसेंबर ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र त्या आधीच या निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ९ जानेवारीपर्यंत इच्छुक कंत्राटदारांना निविदा सादर करता येणार आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मात्र निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याने सुविधा उपलब्ध करण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>करोना प्रतिबंधासाठी पालिका सज्ज; रुग्णालयांतील सुविधांचा आढावा

इच्छुक कंत्राटदार कंपन्यांनी निविदा सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकिय संचालक कैलास जाधव यांनी दिली. लवकरात लवकर ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम सुरू झाल्यानंतर ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याचेही नियोजन आहे. सुविधा चांगल्या प्रकारे विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचेही जाधव यांनी सांगितले. दरम्यान, या दीड वर्षाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात येथे आणखी चांगल्या सुविधा कशा पुरविता येतील यावरही विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facilities on samriddhi highway will be delayed mumbai print news amy
First published on: 27-12-2022 at 12:03 IST