मुंबई : विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, पर्यटनस्थळे आदींसाठी कर्जत प्रसिद्ध आहे. मुंबई-पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटीवरून लोकलने थेट कर्जतला जाता येते. तर, येत्या काही वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटीवरून पनवेलमार्गे कर्जत गाठणे शक्य होणार आहे. पनवेल – कर्जत या नव्या उपनगरीय दुहेरी मार्गामुळे मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी लोकलचा आणखी एक मार्ग उपलब्ध होईल. सध्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

मुंबई महानगराचे विस्तारीकरण होत असून महानगरातील प्रत्येक ठिकाण जलदगतीने जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या कामातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे बोगदा तयार करणे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन ३,१४४ मीटर लांबीचे बोगदे तयार केले जात आहेत. यापैकी बोगदा क्रमांक २ वावर्ले हा २,६२५ मीटर लांबीचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसेच या मार्गातील बोगदा क्रमांक १ नढालची लांबी २१९ मीटर आणि बोगदा क्रमांक ३ किरवलीची लांबी ३०० मीटर आहे.

हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून ९ सोमालियन चाच्यांना अटक

ऑक्टोबर २०२२ रोजी नढाल बोगद्याचे खोदकाम सुरू झाले होते. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण झाले. आता सध्या जलरोधकीकरण आणि सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. तर, २९ सप्टेंबर २०२३ रोजी किरवली बोगद्याचे खोदकाम सुरू झाले असून हे काम ३० मार्च २०२४ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच २ एप्रिल २०२४ पर्यंत २,६२५ मीटर लांबीच्या वावर्ले बोगद्याचे २,४२५ मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. येत्या महिन्यात हे खोदकाम पूर्ण होईल. पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी नवा उपनगरीय मार्ग उपलब्ध होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सुनील उदासी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कर्जत धीम्या लोकलने जाण्यासाठी कमीत कमी सव्वादोन तास लागतात. तर, जलद मार्गाने कमीत कमी दोन तास लागतात. मात्र मेल-एक्स्प्रेस, मालगाड्या आणि अपुऱ्या रेल्वे मार्गामुळे कर्जत गाठण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त विलंब होतो. सध्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी – पनवेल लोकलने जाण्यासाठी एक तास २० मिनिटे लागतात. जर पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग सुरू झाल्यास हार्बर मार्गावरून सीएसएमटी – पनवेल – कर्जत लोकल प्रवास साधारणपणे २.२० तासांत पूर्ण होईल. तसेच भविष्यात हार्बर मार्गावरून सीएसएमटी-पनवेल जलद लोकल धावल्यास, प्रवासाचा कालावधी आणखी कमी होईल.