मुंबई : भगवा दहशतवाद कधीच नव्हता, आताही नाही आणि भविष्यातही असणार नाही. ‘भगवा दहशतवाद ’ असा शब्द तयार करून हिंदू दहशतवादाचा अपप्रचार (फेक नॅरेटिव्ह) करण्याचा प्रयत्न तत्कालीन यूपीए सरकारने केला होता. तो खोटा असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
हिंदू किंवा भगवा दहशतवाद असा अपप्रचार करून निवडणुकीत अल्पसंख्याकाचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने केला होता. काँग्रेस व यूपीए सरकारने षड्यंत्र रचून भगवा दहशतवाद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्यांच्यावर कारवाई केली, त्यांची माफी मागावीच. पण हिंदू समाजाला दहशतवादी दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसने हिंदू समाजाचीही माफी मागावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या निकालाचा सविस्तर अभ्यास करून पुढील निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. भगव्या दहशतवादाचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याबद्दल शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अभिनंदन करायला हवे होते. पण ते लांगूलचालन करणाऱ्यांबरोबर गेल्याने आता प्रश्न उपस्थित करीत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.